MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

हजारो वर्षांपूर्वीच्या 2 शिव मंदिरांवरुन थाडलंड आणि कंबोडियात युद्ध, आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू, लाखोंचं स्थलांतर

Written by:Smita Gangurde
Published:
हजारो वर्षांपूर्वीच्या 2 शिव मंदिरांवरुन थाडलंड आणि कंबोडियात युद्ध, आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू, लाखोंचं स्थलांतर

बँकॉक- भारताबाहेर दोन देशांमध्ये दोन शिव मंदिरावरुन युद्ध पेटलं असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये 1000 वर्ष जुन्या शिव मंदिरांवरुन युद्ध पेटलंय. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही देशांतील संघर्ष सुरु आहे.

थायलंड सरकारच्या माहितीनुसार या युद्धामुळे 1 लाख नागरिकांना घर सोडून स्थलांतर करावं लागलेलं आहे. थायलंडमध्ये या युद्धामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका सैनिकाचा आणि 14 सामान्य नागरिकांचा समावेश आहे. तर 46 जणं जखमी झाले आहेत. कंबोडियाकडून मृतांची अधिकची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नसली तरी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

भारतीय दुतावासाची भारतीयांसाठी सूचना

थायलंड आणि कंबोडियाच्या सीमा भागातील 8 जिल्ह्यांमध्ये मार्शल लॉ घोषित करण्यात आलाय. या वादाच्या पार्श्वभूमीवर थायलंडमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दुतावासानं सूचना जारी केल्या आहेत. यात भारतीय नागरितकतांनी थायलंड आणि कंबोडियाच्या सीमे परिसरात सात राज्यांत जाऊ नका असा सल्ला देण्यात आलाय. यात उबोन रत्चथानी, सुरिन, सिसाकेत, बुरीराम, सा काओ, चंथाबुरी आणि ट्राट यांचा समावेश आहे.

मंदिरावरुन नेमका काय आहे वाद?

थायलंड आणि कंबोडियाचा इतिहास हा कंबोडियातील खमेर साम्राज्य आणि थायलंडमधील सियाम साम्राज्याच्या युद्धाशी संबंधित आहे. फ्रान्स आणि ब्रिटिशांच्या राजवटीतही या दोन्ही देशात सीमेवरुन वाद होता. त्यात प्रीह विहियर आणि ता मुएन थॉम मंदिरांवरुन आणि त्यांच्या जमिनीवरील अधिकारावरुन कायदेशीर आणि राजकीय वाद सातत्यानं सुरु राहिलेला आहे.

1907 साली जेव्हा कंबोडिया फ्रान्सच्या ताब्यात होतं, त्यावेळी दोन्ही देशांमध्ये 817 किमी लांबीची सीमा रेषा आखण्यात आली. प्रिय विहार मंदिर या नव्या नकाशात कंबोडियात दाखवण्यात आल्यानं थायलंडमध्ये याचा विरोध करण्यात आला. तर ता मुएन थॉम मंदिर थायलंडमध्ये दाखवण्यात आल्यानं कंबोडियातून याला विरोध करण्यात आला.

ता मुएन थॉन मंदिरावर कंबोडियाचा दावा

ता मुएन थॉ मंदिर नेमक्या कोणत्या देशाच्या हद्दीत आहे यावरुन वाद पेटलेला आहे. दोन्ही देश या मंदिरावार दावा करतायेत. थायलंडच्या भागात हे मंदिर असलं तरी खमेर साम्राज्यात ते उभारण्यात आलं होतं असा दावा करण्यात येतोय.

खमेर राजवट ही कंबोडियातील शक्तिशाली राजवट होती, जी 9 व्या ते 15 व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. या काळात कंबोडियातील या साम्राज्याचा विस्तार लाओस, थायलंड, व्हिएतनाम भागात होता. तर थायलंडचा दावा आहे की हे मंदिर कंबोडियाचं असू शकतं पण मंदिराच्या आसपास असलेल्या जमिनीवर थायलंडचा अधिकार आहे. दोन्ही देशांच्या सैन्याकडून या मंदिराच्या परिसरात नियमित गस्त घालण्यात येते. दोन्ही देशांतील सैन्यांत या परिसरात बाचाबाचीही होते. असाच एक वाद नुकताच झालेला आहे.

प्रीह विहार मंडिरावर थायलंडचा दावा

या मंदिरावरुन दोन्ही देशात असलेला वाद हा अधिक आहे. थायलंड या मंदिरावर नियंत्रण मिळवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतंय मात्र 1959 साली कंबोडियानं याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केलं होतं. 1962 साली हे मंदिर कंबोडियाचं असल्याचा निर्णय न्यायालयानं दिला. कोर्टानं थायलंडचं सैन्य काढण्याचे आदेशही दिले. थायलंडनं हा निर्णय मान्य केला असला तरी आसपासच्या जमिनीवरुन वाद सुरुच आहेत.

युनेस्कोनं 2008 साली हे मंदिर वर्ल्ड हेरिटेज घोषित केल्यानंतर वाद आणखी तापला. दोन्ही देशांच्या सैन्यात यावरुन चकमकी सुरु झाल्या. 2011 साली परिस्थिती इतकी चिघळली की हजारो नागरिकांना घरं सोडून जाण्याची वेळ आली. 2103 साली न्यायालयानं पुन्हा एकदा मंदिर आणि परिसरातील जमीन कंबोडियाची असल्याचा निर्णय दिला. थायलंडला सैन्य हटवण्याचे आदेश दिले, तरीही सीमेचा मुद्दा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही.

आता सद्यस्थितीत वादाचं कारण काय?

दोन महिन्यांपासून दोन्ही देशांतील सैन्यात पुन्हा संघर्ष सुरु झालाय. 28 मे रोजी दोन्ही सैन्यातील सैनिक एकमेकांना भिडले, यात एका कंबोडियाच्या सैनिकाचा मृत्यू झाला. या जागेवर कंबोडिया, थायलंड आणि लाओस हे तिन्ही देश दावा करतायेत. गुरुवारी सकाळी हा वाद पुन्हा पेटला. वादातून गोळीबार होण्यापर्यंत वेळ गेली.