MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे खळबळ, कोण होणार नवे उपराष्ट्रपती?

Written by:Smita Gangurde
Published:
जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारलाय. आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे खळबळ, कोण होणार नवे उपराष्ट्रपती?

नवी दिल्ली – पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एकाएकी राजीनामा दिला. यानंतर दिल्लीसह देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला?, या प्रश्नाभोवती अनेक तर्कवितर्क लढवले जातायेत.

जगदीप धनखड यांनी आरोग्याचं कारण देत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला असला तरी, यामागे नेमकं कारण काय? यावरुन चर्चा सुरु झालीय. विशेष म्हणजे ज्या विरोधकांनी उपराष्ट्रपती धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता, त्यांनाच या राजीनाम्यानंतर प्रेम उफाळून आलंय.

काय म्हणाले संजय राऊत?

उपराष्ट्रपतींनी ज्या प्रकारे राजीनामा दिला आहे ती काही साधारण घटना नाही, असे मला वाटतं. त्यांनी जे तब्येतीचे कारण दिले आहे, ते मला मान्य नाही. ते अतिशय स्वस्थ आणि आनंदी राहणारे व्यक्ती आहेत. ते अशाप्रकारे मैदान सोडून जाणारे व्यक्ती नाहीत. आमचे त्यांच्यासोबत मतभेद असू शकतात, पण ते सहजरित्या मैदान सोडणारे व्यक्ती नाहीत. ते लढणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. ते एकदम ठणठणीत आहेत. मी दिवसभर त्यांना पाहिलं आहे, त्यांची तब्येत अतिशय चांगली आहे.

राज्यसभेत नेमकं काय घडलं?

राजीनाम्याच्या दिवशी, म्हणजेच 21 जुलैला संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता धनखड राज्यसभेत आसनस्थ झाले. त्यांनी दिवंगत खासदारांना श्रद्धांजली वाहिली आणि नवीन सदस्यांना शपथही दिली. महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी विरोधी पक्षांनी मांडलेले 18 स्थगन प्रस्ताव फेटाळले. याचवेळी, ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

खरगे यांचं भाषण सुरु असतानाच जे. पी. नड्डा यांनी अचानक “काहीही रेकॉर्डवर जाणार नाही. मी जे बोलत आहे ते रेकॉर्डवर राहील, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे,” असं विधान केलं. हे विधान ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण एखाद्या सदस्याच्या विधानावर आक्षेप घेण्याचा किंवा ते रेकॉर्डवरून काढण्याचा अधिकार केवळ सभापतींना असतो.

अनपेक्षित राजीनामा आणि प्रश्नचिन्ह

23 जुलैच्या जयपूर दौऱ्याचा कार्यक्रम संध्या. 4 वाजेपर्यंत जाहीर झाला. सायंकाळी 5.30 नंतर त्यांनी अनेक विरोधी खासदारांची भेट घेतली. त्या भेटीतही राजीनाम्याबद्दल काहीही उल्लेख केला नव्हता. अचानकच त्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली. धनखड राज्यसभेच्या निरोप समारंभालाही उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली. या अनपेक्षित घटनांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आलं

पंतप्रधानांकडून शुभेच्छा, राजीनामाही स्वीकारला

धनखड यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. पण आमदार म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ वगळता त्यांनी त्यांच्या कोणत्याही पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 तासांनी प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी धनखड यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारलाय. आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल.

नवे उपराष्ट्रपती कोण होणार?

धनखड यांच्यानंतर उपराष्ट्रपती कोण होणार? हा सवाल आता उपस्थित होतोय. उपराष्ट्रपतीपदासाठी सध्या काही नावांची चर्चा सुरू आहे.राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्‍हा, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान या नावांची चर्चा सुरु आहे.
तरकाही जणांच्या मते, जर बिहार निवडणुकीनंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली, तर नितीश कुमार हे सुद्धा उपराष्ट्रपती होऊ शकतात. अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.