बिजिंग – अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सरकारनं नोकरीसाठी परदेशातून येणाऱ्या तरुणांच्या व्हिसा फीमध्ये 6 लाखांहून 88 लाख अशी प्रचंड मोठी वाढ केली आहे. या निर्णयानंतर जगभरातील महासत्तांमध्ये संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. यात चीननं नवा के व्हिसा सुरु करण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेत जाणारे जगभरातील बुद्धिमंत चीनकडे वळवण्याचा हा प्रयत्न मानण्यात येत आहे. के व्हिसाच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, गणित या क्षेत्राशी संबंधित युवकांसाठी आणि कौशल्य असलेल्या तरुणाईला हा व्हिसा देण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून हा व्हिसा जारी करण्यात येणार आहे.

चीनची अमेरिकेवर मोठी कुरघोडी
विज्ञान, तंत्रज्ञान या विषयांत संशोधन करणारे विद्यार्थी के व्हिसासाठी अर्ज करु शकणार आहेत. चिनी कंपनीत नोकरी नसली तरी केवळ संशोधनासाठी या व्हिसाद्वारे चीनमध्ये प्रवेश करण्याची संधी आता इतर विकसनशील देशांतील तरुणांना मिळणार आहे. अमेरिकेनं 21 डिसेंबरला व्हिसाचं नोंदणी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चीननं के व्हिसाची घोषणा केली आहे. त्यामुळे चीनचा के व्हिसा हा अमेरिकेच्या एच वन बी व्हिसाचा आता पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
इंग्लंडही मैदानात, 90 हजारांचं शुल्क शून्यावर आणणार
अमेरिकेनं घेतलेल्या आततायी निर्णयानंतर जगभरात त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. इंग्लंडनं कौशल्य असलेल्या तरुणांसाठी देशात असलेली व्हिसा फी माफ करण्याचा विचार सुरू केला आहे. ज्या तरुणांनी जगातील 5 मोठ्या विद्यापीठातून शिक्षण घेतलं किंवा ज्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय अशा तरुणांना व्हिसावर इंग्लंडमध्ये जाण्यासाठी आता कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, याची तयारी आता इंग्लंडकडून करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत इंग्लंडमध्ये ग्लोबल टॅलेंट व्हिसाची किंमत ही 766 पौंड म्हणजे जवळपास 90 हजारांच्या घरात आहे. इंग्लंडचा अर्थसंकल्प 26 नोव्हेंबरला सादर होईल, त्यात व्हिसा फी शून्य करण्याचा निर्णय जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
चीनकडून 12 प्रकारचे व्हिसा दिले जातात
चीन सध्या 12 प्रकारचे वेगवेगळे व्हिसा देतो. त्यात नोकरी करणाऱ्यांना आर व्हिसा किंवा झेड व्हिसा देण्यात येतोय. झेड व्हिसाची मुदत एका वर्षाची असते. तर आर व्हिसावर चीनमध्ये राहण्यासाठी केवळ 180 दिवस मिळतात. आर व्हिसासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही, मात्र त्याची प्रक्रिया बराच काळ चालते आणि क्लिष्ट असते. त्यामुळे आर व्हिसा यशस्वी ठरलेला नाही.
आता नव्यानं घोषणा केलेल्या के व्हिसाच्या माध्यमातून जास्त वर्ष चीनमध्ये विद्यार्थ्यांना राहता येणं शक्य होणार आहे. झेड व्हिसामध्ये नसलेल्या अनेक त्रुटी के व्हिसामध्ये कमी करण्यात आल्या आहेत. मात्र के व्हिसा घेतल्यानं किती काळ चीनमध्ये राहता येईल, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. झेड व्हिसा असलेली व्यक्ती जर चीनमध्ये नोकरी करु इच्छित असेल तर चिनी कंपनीच्या नोकरीच्या ऑफरचं किंवा स्पॉन्सरशीप असणं गरजेचं होतं. के व्हिसात मात्र ही अट शिथिल करण्यात आली आहे. वेगवेगळ्या देशांत चीनकडून के व्हिसाबाबत माहिती दिली जाणार आहे











