लेह- लडाख या केंद्रशासित प्रदेशाला राज्याला दर्जा द्यावा, या मागणी करण्यात आलेल्या आंदोलनानं लेहमध्ये हिंसक वळण घेतलं. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांत चकमक झाली. या चमकीत 4 जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक जणं जखमी झाल्याची माहिती आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी भाजपा कार्यालय आणि सीआरपीएफच्या गाडीला आग लावली. या प्रकरणानंतर प्रशासनानं लेहमध्ये पोलीस परवानगीविना मोर्चा आणि आंदोलन करण्यास मनाई केली आहे.
कशामुळे झालं आंदोलन?
थ्री एडियट फेम सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी आंदोलनासाठी उतरले होते. वांगचूक गेल्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. वांगचूक यांच्या मागणअया मान्य व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आज बंदची हाक दिली होती. नेपाळमध्ये झालेल्या सत्तापालटाप्रमाणे याही ठिकाणी सोशल मीडियावर लडाख बंदची हाक दिली होती. यामुळे मोठ्या संख्येनं विद्यार्थी एकत्रित आले होते.

वांगचूक यांचं उपोषण मागे, हिंसेंचा निषेध
या हिंसाचारानंतर वांगचूक यांनी उपोषण सोडलंय. यानंतर त्यांनी हा दिवस लडाखसाठी दुखाचा दिवस असल्याचं म्हटलंय. गेल्या पाच वर्षांपासून हा लढा शांततेच्या मार्गावर सुरु होता असंही ते म्हणालेत. त्यासाठी उपोषणं केली. दिल्ली ते लेह पदयात्रा केल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय. शांततेच्या संदेशाला अयशस्वी होताना पाहिल्याचं ते म्हणालेत. लडाखमध्ये हिंसा, गोळीबार आणि आगीच्या घटना घडल्यात. लडाखच्या युवा पिढीनं हा मुर्खपणा बंद करावा असं आवाहनही त्यांनी केलंय. हे आंदोलन थांबवत असल्याचं सांगत त्यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली.
आंदोलनकर्त्यांच्या काय होत्या मागण्या
1. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा
2. 6 व्या अनुसूचीनुसार घटनात्मक सुरक्षा
3. कारगिल आणि लेहमध्ये वेगवेगळ्या लोकसभेच्या जागा
4. सरकारी नोकरीत स्थानिकांची भरती
आता या मागण्यांबाबत 6 ऑक्टोबरला सरकारसोबत बैठक होणार आहे. 2019 साली कलम 370 आणि 35 ए हटवताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश करण्याची घोषणा केली होती. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर राज्याचा दर्जा देण्यात येईल असं आश्वासनही देण्यात आलं होतं











