आजच्या काळात स्मार्टफोनमुळे ऑफिस आणि घर यांच्यातील सीमा पूर्णपणे धुसर झाली आहे. त्यामुळे कामाचा दिवस सहा वाजल्यानंतर खरं तर कधीच संपत नाही. उशिरा रात्री येणारे ईमेल आणि बॉसचे तातडीचे मेसेज आता दिनक्रमाचा एक भाग बनले आहेत. या सततच्या कनेक्टिव्हिटीमुळे कर्मचारी कधीच पूर्णपणे कामापासून मुक्त होऊ शकत नाहीत.
या वाढत्या चिंतेचा विचार करून संसदेत एक नवा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. राइट टू डिस्कनेक्ट बिल, 2025.’ हे बिल लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी सादर केले आहे.
या विधेयकाची गरज का आहे?
भारतातील कर्मचाऱ्यांवर सतत ऑनलाइन राहण्याचा दबाव वाढत चालला आहे. दूरस्थ काम, डिजिटल संप्रेषण साधने आणि कंपनीच्या अपेक्षांमुळे मर्यादा ओलांडल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना आराम करणे किंवा त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवणे कठीण झाले आहे. हे विधेयक या गंभीर समस्येचे निराकरण करते आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेनंतर कामापासून दूर राहण्याचे कायदेशीर स्वातंत्र्य देऊन संतुलन पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करते.
राइट टू डिस्कनेक्ट बिल काय प्रस्ताव मांडतो?
प्रत्यक्षात हे बिल कर्मचार्यांना ऑफिसच्या वेळेबाहेर कामाशी संबंधित कम्युनिकेशनपासून दूर ठेवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या नियमांतर्गत हे सुनिश्चित केले जाते की कर्मचारी कामाच्या वेळेनंतर स्वतःला स्विच ऑफ करू शकतील आणि नियोक्त्यांनी त्या मर्यादेचा आदर करावा. कामाचा दिवस संपल्यानंतर कर्मचार्यांवर फोन कॉल्सला उत्तर देणे, ईमेलला प्रत्युत्तर देणे किंवा अपूर्ण काम पूर्ण करण्याचा दबाव राहणार नाही.
विधेयकात असे म्हटले आहे की आपत्कालीन परिस्थितीत नियोक्ते कामाच्या तासांनंतर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतात, परंतु कर्मचाऱ्यांना प्रतिसाद देणे बंधनकारक नाही. कामाच्या वेळेनंतर संवाद साधणे पर्यायी करून, हे विधेयक निरोगी कामाच्या सवयींना प्रोत्साहन देईल आणि भावनिक थकवा कमी करेल.
हे बिल कर्मचार्यांच्या अधिकारांना कसे बळकटी देते?
या बिलाची सर्वात मोठी ताकद म्हणजे ते अनुशासनात्मक कारवाईपासून मिळणारे संरक्षण. जर एखाद्या कर्मचार्याने कामाच्या वेळेनंतर कॉल न उचलण्याचा किंवा मेसेजला उत्तर न देण्याचा निर्णय घेतला, तर कंपनी त्यांना यासाठी कोणतीही शिक्षा कायदेशीररित्या देऊ शकणार नाही.
यासोबतच, ज्या परिस्थितीत कर्मचारी स्वतःच्या इच्छेने कामाच्या वेळेनंतर कॉल किंवा मेसेजला उत्तर देतात, अशा वेळी मानक वेतनदरावर ओव्हरटाइमचे भरणे अनिवार्य करण्याची तरतूद या बिलात आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना दंड
नियमांचे योग्य पालन व्हावे यासाठी, विधेयकात डिस्कनेक्ट करण्याच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या नियोक्त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्याच्या एकूण पगाराच्या १% दंड आकारला जाऊ शकतो.