मुंबई- व्हॉट्सअॅप आता केवळ वापरातील अॅप राहिलेलं नाही, तर आपल्या सगळ्यांच्या जगण्यातील एक अविभाज्य घटक झालेलं आहे. सध्याच्या स्थितीत व्हॉट्सअॅप वापरत नाही, अशा व्यक्ती अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत, या वापरामुळेच सगळ्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप आहे. एका अहवालाच्या माहितीनुसार २०२५ या वर्षात जगभरात वॉट्सअॅपचे 300 कोटींपेक्षा जास्त युझर्स आहेत. आपल्या देशाचा विचार केला तर देशात या वर्षी ७९.५७ कोटी जनता ही व्हॉट्सअॅपचा वापर करते आहे. व्हॉट्सअपची वाढती लोकप्रियता पाहता या माध्यमातून अनेक सायबर गुन्ह्यांच्या घटनांतही वाढ झालीये.

सायबर गुन्ह्यांत व्हॉट्सअॅप पहिल्या क्रमांकावर
केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या एका अहवालानुसार देशात सायबर गुन्ह्यांत व्हॉट्सअॅप पहिल्या क्रमाकांवर आहे. २०२४ च्या पहिल्या तीन महिन्यात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सायबर घोटाळ्यांची संख्या ४३७९७ इतकी मोठी होती. त्याखालोखाल टेलिग्राम २२६८० तर इन्स्टाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांची १९८०० प्रकरणे होती. त्यामुळेच व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी जास्त काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
व्हॉट्सअॅप अकाऊंट कसे होतात हॅक
व्हॉट्सअॅप हॅक करण्यासाठी हॅकर्स सोशल इंजिनिअरिंग, फिशिंग, मालवेअर किंवा ओटीपीची मदत घेतात. यासोबतच व्हॉट्सअप वेबचा चुकीचा वापर करत स्कॅमर्स अकाऊंट दुसऱ्याच कुठल्यातरी डिव्हासईवर सुरु करतात.
व्हॉट्सअॅप हॅक होणं किती धोकादायक
व्हॉट्सअपमध्ये पर्सनल फोटो, व्हिडीओ, ऑडिओ आणि महत्त्वाची कागदपत्र ठेवलेली असतात. त्यामुळेच व्हॉट्सअप अकाऊंट सुरक्षित ठेवणं हे प्रायव्हसी आणि सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानण्यात येतं. तुमचा व्हॉट्सअप डेटा चुकीच्या माणसाच्या हाती गेल्यास, तो त्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता आहे.
१. हॅकर तुमच्या नावाचा आणि मोबाईल नंबरचा चुकीचा वापर करु शकतात
२. तुमच्या मित्र आणि कुटुंबीयांकडून ते पैसे मागू शकतात
३. तुमचे पर्सनल फोटो, व्हिडीओ, चॅट पाहू शकतात
४. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चुकीचे, खोटे मेसेज पसरवू शकतात.
५. तुमच्या खासगी बाबींवर तुम्हाला ब्लॅकमेल करु शकतात.











