कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे वादग्रस्त वागणे काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. कधी वादग्रस्त वक्तव्ये तर कधी वादग्रस्त वागणे अशा माणिकराव कोकाटेंचा विधीमंडळातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळामध्ये गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला. विरोधकांकडून दबाव वाढत आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी माणिकराव कोकाटेंसोबत चर्चा करणार आहेत. त्यामध्ये आता आमदार रोहित पवारांनी महत्वपूर्ण दावा केला आहे, सोमवारी कोकाटे राजीनामा देतील, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
माणिकराव कोकाटे पदाचा राजीनामा देणार?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मंगळवारी कॅबिनेटची बैठक असून त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
“बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत शिंदे साहेब कधी दाखवणार?” असा सवाल रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील विचारला आहे.
पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री मा. अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का?
बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 25, 2025
मुख्यमंत्र्याची दिल्लीवारी; राज्यात मोठी उलथापालथ?
शिंदेंच्या शिवसेनेतील काही आमदार आणि मंत्री तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही मंत्री आणि आमदारांचे वर्तन मुख्यमंत्र्यांना पटलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं बैठक झाली. त्यामुळे वादग्रस्त मंत्री आणि आमदारांवर कारवाईची शक्यता वाढली आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अवस्था झाली ही येड्याची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी झाली आहे. कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार बनियानवर खाली उतरून कँन्टिन वाल्यांना मारहाण करतो. विधीमंडळाच्या प्रांगणात गँगवारसारखी भांडणं होतात. कधी एखादा मंत्री करोडो रूपये मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो. तर आता तर हद्द विधीमंडळाच्या सभागृहामध्ये कृषीमंत्री रम्मी गेम खेळताना दिसतात. नुकताच कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानभवनातील रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाला आता वेगळीच गती मिळाली आहे. आता कुणावर काय कारवाई होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





