पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ४० एकर जमिनीच्या व्यवहारावरुन पार्थ पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यांच्यामुळे अजित पवारही अडचणीत आले आहेत. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या १ लाखांचे भाग भांडवल असलेल्या अमेडिया या कंपनीने तब्बल १८०४ कोटी रूपये किंमत असलेली जमीन, अवघ्या ३०० कोटींत खरेदी केली आहे. वतनाच्या जमिनी या अहस्तांतरीत असतात. तरीही हा व्यवहार झाल्याने बड्या व्यक्तीनेच सूत्रे हलविल्याचा संशय आहे. राजकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
कडक कारवाई करण्याची अण्णा हजारेंची मागणी
एखाद्या मंत्र्याचा मुलगा चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष आहे. त्यासाठी संस्कार हे महत्त्वाचे असतात. एखादा व्यक्ती घडण्यासाठी कुटुंबाचे संस्कार, घराण्याचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात, असा हल्लाबोल अण्णा हजारे यांनी पवार कुटुंबावर केला. त्याचवेळी राळेगण सिद्धी किती मोठं गाव आहे, पण कधीही गडबड नाही. गोंधळ नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. शिवाय या प्रकरणात कोणताही मुलाहीजा न ठेवता कडक कारवाई करा, असा सल्ला अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

पार्थ पवारांनी 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी बुडविली ?
सर्वसामान्यांना घर खरेदी करताना घराच्या किमतीच्या 5 ते 7 टक्के स्टँप ड्युटी भरावी लागते. पार्थ पवारांच्या कंपनीनं खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात सुमारे 21 कोटींची स्टँप ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं. मात्र केवळ ५०० रुपये स्टँप ड्युटी भरल्याचा आरोप करण्यात येत आहे. असा आरोप सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. शिवाय दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अशी कोणतीही तक्रार आपल्याकडे आली नसल्याचे म्हटले आहे.
1,800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल अशा कोरेगाव आयटी पार्क परिसरातील सरकारी जमीन कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतोय. या जमिनीचा बाजारभाव तब्बल 1800 कोटी होता. पण पार्थ पवारांच्या कंपनीने ही जमीन 300 कोटीत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आता दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काय रणणीती आखावी यासाठी या बैठका पार पडत आहेत. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे या बैठकीत आपल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. या दरम्यान एक धक्कादायक बातमी आज सकाळपासून चर्चेत आहे.











