एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना दुसरीकडे महायुतीमधील मतभेद दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहेत. एकीकडे शिंदे गटाच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे मुंबईत अजित पवारांचे राष्ट्रवादी आपल्यासोबत नसावी अशी भूमिका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी घेतली आहे. या भूमिके मागचं कारण ठरलेत ते म्हणजे नवाब मलिक. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डचे आरोप असल्याने त्यांच्याशी युती करायला आशिष शेलार तयार नाहीत.
नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतला आहे. यावरून महायुतीमध्ये मतभेद पाहायला मिळाले. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला भाजपचा विरोध केला आहे. अजित पवारांनी नवाब मलिक यांच्याकडे मुंबईचे नेतृत्व देऊ नये अन्यथा आम्ही मुंबईत अजित पवार गटासोबत युती करणार नाही अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली. नवाब मलिक यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही तडजोड करु शकत नाही.

अजित पवारांनी निर्णयाचा फेरविचार करावा
आम्ही आमची भूमिका वरिष्ठांना सांगीतली आहे. नवाब मलिकांसंदर्भात कोर्टाने निर्देश दिले आहेत, त्यामुळे आम्ही युती करू शकत नाहीत. अजित पवार यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा. विधानसभा निवडणुकीत मलिक यांच्याशी फारकत घेताना आमची भूमिका स्पष्ट केली होती. ते जर मुंबईत राष्ट्रवादीचे नेतृत्व करणार असतील तर आम्ही त्यांच्याशी जुळवून घेऊ शकत नाही. असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता भाजपनं घेतलेल्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करणार की नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
अजित पवार गटाची भूमिका काय??
दरम्यान आशिष शेलार यांच्या या भूमिकेवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नवाब मलिक हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे ती योग्यच आहे. कोण काय बोलते याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. एकमेकांवर टीका न करता आम्ही या निवडणुकांना पुढे जात आहोत, तसेच आमची महायुती भक्कम आहे, असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं.