शेतकरी कर्जमुक्ती आणि हमीभाव यांसह विविध मागण्यासाठी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी एक खळबळजनक विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. शेतकऱ्यांनो तुम्ही स्वत: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.
सरकार हे डुकरासारखं आहे – Bachhu Kadu
बच्चू कडू यांची शेतकरी शेतमजूर हक्क परिषद बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात पोहचली आहे. यावेळी एका जाहीर सभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. शेतकऱ्यांनो, आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका… बच्चू कडू यांनी थेट आमदारांबद्दल केलेल्या वादग्रस विधानानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण आणखी पेटू शकते. विशेष म्हणजे बच्चू कडू यांच्या भाषणावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते.

तुमच्यापेक्षा बैल बरा
बच्चू कडू (Bachhu Kadu) पुढे म्हणाले, तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात. शेतकऱ्यावर आज इतक्या मोठ्या प्रमाणात अन्याय होत असताना तुम्ही गप्प कसं राहू शकता?? तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते. अशा शब्दांत बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.