MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

वाढदिवसाचे औचित्य आणि राज-उद्धव ठाकरेंची भेट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया?

Written by:Rohit Shinde
Published:
आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
वाढदिवसाचे औचित्य आणि राज-उद्धव ठाकरेंची भेट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया?

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. तब्बल 13 वर्षांनंतर राज ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी भेट दिली. हे दोघेही सध्या राज्यात सुरु असलेल्या मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येऊ शकतात अशा शक्यता वर्तावल्या जात आहेत, तसेच या चर्चांना उधाण देखील येत आहे. त्यामध्ये आज खुद्द राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने युतीच्या चर्चा आणखी बळावल्या आहेत. आजच्या या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  ‘उद्धवजींचा जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे गेले होते ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्याही शुभेच्छा उद्धव ठाकरेंना आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर त्यात राजकारण पाहणं योग्य नाही.’ ‘राज्याच्या मनात काय आहे ते आपल्याला विधानसभा निवडणूकीत दिसलं आहे. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही.’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा बळावली!

काही आठवड्यांपूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर ठाकरे बंधू आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मराठीसाठी दोघं एकत्र आल्यापासून, त्यांची युती होण्याची शक्यता अधिक ठळकपणे व्यक्त केली जाऊ लागली. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी यावेळी फक्त शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर त्यांच्या एका भावनिक कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मातोश्रीवर पोहोचल्यावर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. त्यांनी बाळासाहेब बसायचे त्या विशेष खुर्चीला वंदन करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

नुकताच 5 जुलै 2025 रोजी झालेला मराठीच्या मुद्द्यावर दोघांचा एकत्रित विजयी मेळावा संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर त्यांच्या भेटीला गेले होते. यावेळी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मनसे नेतेही राज ठाकरेंसोबत मातोश्रीवर दाखल झाले होते.