MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

छावा संघटना सध्या चर्चेत का आली? लातुरात जन्मलेल्या या आक्रमक संघटनेचा इतिहास काय?

Published:
छावा संघटना सध्या चर्चेत का आली? लातुरात जन्मलेल्या या आक्रमक संघटनेचा इतिहास काय?

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतून उदयास आलेल्या अनेक मराठा संघटनांपैकी ‘छावा’ ही एक महत्त्वाची आणि कायमच चर्चेत राहिलेली संघटना आहे. 1990 मध्ये स्थापन झालेली ही संघटना, मराठा तरुणांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी, विशेषतः आरक्षणासाठी सुरू करण्यात आली होती. ‘छावा’ची कार्यशैली आतापर्यंत कायम आक्रमक राहिली आहे. ज्या लातूरमध्ये ही संघटना जन्माला आली त्याच लातूरमध्ये ‘छावा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याने लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात ही संघटना जास्तच आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा स्थितीत आपण या संघटनेचा इतिहास काय आहे या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

‘छावा’ संघटना: लातूरशी असलेलं सखोल नातं

मराठा तरुणांचा आवाज म्हणून 1990 मध्ये उभी राहिलेली ‘छावा’ संघटना लातूरमध्येच जन्माला आली आणि आजवर तिचं कार्य प्रामुख्याने आक्रमक आंदोलनात्मक राहिलं आहे. अण्णासाहेब जावळे यांनी स्थापन केलेल्या या संघटनेने लातूरच्या राजकारणात ठसा उमठवला आहे.

एकेकाळी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात अण्णासाहेब जावळे यांनी एका IAS अधिकाऱ्याला कानाखाली मारल्याची घटना संपूर्ण राज्यात पसरली. त्यानंतर ‘छावा’ या नावाला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

अलीकडेच लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी ‘छावा’चे पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली. यामागे एक जुना वाद होता, सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यात घाडगे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निषेध करत पत्त्यांचा संच उधळून निषेध नोंदवला होता. यानंतर तणाव वाढला आणि सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी घाडगे यांना बेदम मारहाण केली. चव्हाण यांनी क्षमायाचना केली असली तरी लातूरमध्ये वातावरण ताणलेलं राहिलं.

छावाचा लढा: आरक्षण आणि अधिकारासाठी

‘छावा’ संघटनेचा मुख्य मुद्दा म्हणजे मराठा समाजासाठी आरक्षण. शिक्षण व नोकरीत 10% आरक्षणाची मागणी ही गेली दोन दशकं संघटनेच्या केंद्रस्थानी आहे. 2000 नंतर झालेल्या बहुतांश आंदोलनांमध्ये ‘छावा’ ने पुढाकार घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्या 2023 मधील अंतरवली सराटी आंदोलनालाही छावाचा जोरदार पाठिंबा होता. पोलिसांच्या कारवाईनंतर संघटना अधिक आक्रमक झाली आणि ठिकठिकाणी निदर्शने झाली.

आक्रमकता आणि वादग्रस्त घटना

छावा ही केवळ सामाजिक संघटना न राहता एक दबावगट म्हणून उदयास आली आहे. काही वेळा या संघटनेवर कायदा हातात घेतल्याचे आरोपही झाले आहेत. धाराशिव येथे कर्नाटकच्या बसवर हल्ला, बीडमध्ये आमदारांच्या घरांवर मोर्चा अशा अनेक घटनांमध्ये छावाचं नाव चर्चेत आलं.

लातूरच्या राजकारणात छावाची भूमिका

लातूर आणि धाराशिव परिसरात छावाचा प्रभाव आजही मोठा आहे. विशेषतः स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीगत समीकरणं महत्त्वाची ठरत असताना छावाचं आक्रमक होणं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतं. मराठा समाजात असलेली नाराजी आणि छावाचे आक्रमक आंदोलन हे पक्षाची प्रतिमा बिघडवू शकतात, अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.