गडचिरोली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवशी मुंबईत शुभेच्छा आणि हार तुऱ्यांचा स्वीकार करण्याचं टाळलं. या दिवशी त्यांनी दौरा केला तो पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा. गडचिरोली जिल्ह्याचा विकास मुख्यमंत्र्यांसाठी किती महत्त्वाचा आहे, हेच यातून त्यांनी दाखवून दिलं.
गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 24 हजार कोटींच्या स्टील प्लान्टची पायाभरणी करण्यात आली. रुग्णालय, सीबीएसई शाळा, टाऊनशीपचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 1 कोटी वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभही वाढदिवसाच्या मुहुर्तावर गडचिरोलीत करण्यात आलं.
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करणार- फडणवीस
गडचिरोली नक्षलमुक्त करण्याचा आणि गोरगरीब आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहधारेत सामील करून घेण्याचा संकल्पच मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केला. पालकमंत्री असलेल्या फडणवीसांनी विकासकामांचा शुभारंभ करून आपला वाढदिवस साजरा केला.
गडचिरोलीत उभारण्यात आलेल्या ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी’च्या 4.5 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेच्या पॅलेट प्लांटचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. 24 हजार कोटींची गुंतवणूक असलेला विदर्भातला हा पहिलाच स्टील प्लान्ट आहे. यातून 10 हजार लोकांना रोजगार मिळण्याची आशा आहे. यावेळी हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलाईनचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्याशिवाय 100 खाटांच्या रुग्णालयाचं, आधुनिक सीबीएसई शाळेचं आणि सोनमपल्ली इथल्या लॉईडस टाऊनशीपचे भूमिपूजन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं
महिलांना ट्रक चालवण्याचा रोजगार
विशेष म्हणजे कोनसरी इथं लोहखनिजाचे पर्यावरणपूरक वहन करणार्या 9 ट्रक्सचं झेंडा दाखवून फडणवीसांनी लोकार्पण केलं. हे सर्व ट्रक्स महिला चालवणार आहेत, हे विशेष. त्याशिवाय गडचिरोली कृषी महाविद्यालयात फडणवीसांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. एकट्या गडचिरोलीत 1 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात 40 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय.
गडचिरोलीकडे मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर गडचिरोलीवर विशेष लक्ष दिलंय. नक्षलींचा मोठा प्रभाव असलेल्या या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद फडणवीसांनी स्वीकारलं. कधीकाळी माओवाद्यांचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख होती. ती पुसून टाकून, विकासाच्या मुख्य प्रवाहधारेत आदिवासींना सामावून घेण्याचा संकल्प फडणवीसांनी वाढदिवसाच्या निमित्तानं सोडलाय. जल, जमीन, जंगलाचा विनाश होऊ न देता आदिवासींचा विकासाचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या फडणवीसांच्या या भगीरथ प्रयत्नांचं कौतुक करायला हवं.





