Eknath Shinde : एकीकडे शिंदे गट आणि भाजप यांच्या जागावाटप आणि अन्य मुद्द्यावरून तणावाचं वातावरण असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपचे झोप उडवून देणारं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी खुद्द अमित शहा यांनाच खिशात घातले आहे. येत्या दोन महिन्यात एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे वाटते असे विधान करून प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्वतःची पॉवर काय आहे हे दाखवून दिलं आहे. राज्यात आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही वेगळे लढणार असल्याचं भाजप सांगत होती. मात्र, एकनाथ शिंदे हे अमित शहा यांना भेटल्यानंतर आता भाजप नेत्यांना माघार घ्यावी लागली, कारण युती करुन लढू अस सांगण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातलं आहे, ही त्यांची किमया आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
शिंदे अमित शहा सारख्यांना खिशात घालतात (Eknath Shinde)
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, शरद पवार चाणक्य आहेत. काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला होता. मला हे आणि असच दिसत आहे. अमित शाह सारख्याला ते खिशात घालतात असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या मुद्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, खेळ आता सुरु झाला आहे. NDA मध्ये अजून काही होणार का? हे पाहू आणि मग कुठं जायचं ते ठरवू असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या भविष्यवाणीवर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






