MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण, महायुतीत धाकधूक वाढली

Written by:Astha Sutar
Published:
पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असताना सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला कूच केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण, महायुतीत धाकधूक वाढली

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे बुधवारी सांयकाळी अचानक दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले. दिल्लीत संसदीय अधिवेशन सुरु असून, शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे महायुतीत धाकधूक वाढली असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिंदे दिल्लीत कोणाची भेट घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन शिंदेंची नाराजी?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनात सभागृहात पत्ते खेळताना व्हिडिओ वायरल झाला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. परंतु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री कोकाटे यांना अखेरची संधी देत राजीनामा घेतला नाही. मात्र अजित पवार यांनी शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा मग माझ्या मंत्र्यांचा निर्णय घेईल, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार म्हणाल्याचे समजते. त्यामुळे महायुतीतील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्याचे समजते.

शिंदे अमित शहांची भेट घेणार?

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून महायुतीतील धुसफूस समोर आली आहे. राज्यात महायुतीत वादविवाद झाले, महायुतीतील विशेष करुन शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप झाले की शिंदे दिल्ली वारी करतात. पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असताना सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. बुधवारी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला कूच केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज ते खासदारांची तसेच अन्य नेत्यांनी भेट घेणार आहेत. तसेच अमित शहांची सुद्धा शिंदे भेट घेणार असल्याचे बोलले जाते.