‘त्या’ कार्यक्रमाचे अजित पवारांना निमंत्रण देणार नाही, गोपीचंद पडळकरांनी जाहीर केली भूमिका

Arundhati Gadale

पुणे :  मे महिन्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पुण्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित करणार असल्याचे पडळकर म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याना निमंत्रण देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण निमंत्रण देणार नाही, असे पडळकर यांनी जाहीर केले. ते म्हणाले, हा काही सरकारचा कार्यक्रम नाही. हा धनगर समाजाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्यासंदर्भात समाजच निर्णय घेईल.

गोपीचंद पळकर यांनी संभाजी बिग्रेडवर देखील टीका केली. ते म्हणाले, शरद पवार सत्तेत नसतात तेव्हा काही संघटना राज्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करतात. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यात येऊ नये. तसेच पुतळ्याला 20 पोलिसांचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी देखील पळकर यांनी केली.

…तर बायकोला सोडणार का?

राज्यात बहुजन विरुद्ध ब्राम्हण असा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. संभाजी ब्रिगेड ब्राम्हणांना विरोध करत आहेत. त्यांच्या आई वडिलांची लग्न ब्राम्हणाaने लावली त्यामुळे वडिलांना आईला सोडायला सांगणार का? तसेच तुमचे लग्न आणि घर बांधले असेल तर त्याची पूजा देखील ब्राम्हणाने केली असेल तर मग बायको आणि घरपण सोडणार का? असा सवाल देखील त्यांनी विचारला.

नव्याने इतिहास लिहा

शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या ताब्यात आहे. त्यामुळे शरद पवारांकडे वेळच वेळ आहे. त्यामुळे त्यांनी नव्याने इतिहास लिहावा, असा टोला देखील पडळकर यांनी लगावला. तसेच काही इतिहासकार हे शरद पवारांना फाॅर आहेत. इतिहासत लिहिताना जिवा महाल, शिवा काशीद यांच्या विषयी एक पान तरी लिहिले का? असा सवाल देखील पडळकर यांनी विचारला.

ताज्या बातम्या