मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात येणार आहेत. यावेळी आरक्षण घेऊनच जाणार असा इशारा सुद्धा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. यासाठी मनोज जरांगे यांना मुंबईत 29 ऑगस्टला आंदोलन करू देण्यात येऊ नये व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता जरांगे विरूद्ध गुणरत्न सदावर्ते असा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
जरांगेंना मुंबईत प्रवेश देऊ नका -सदावर्ते
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरासह मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. अशा वेळी जाणूनबुजून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा जमाव मुंबईत आणून कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण केला जात आहे, असा आरोप वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. डॉ. सदावर्ते यांनी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि जालना येथील पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच आजच आझाद मैदान पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार नोंदवण्यासाठी डॉ. सदावर्ते आणि जयश्री पाटील जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
” 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरु होणार आहे. यावेळी आम्हाला कोणीही आडवं येणार नाही. कारण आमच्या नोंदी सापडल्या आहेत. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मुंबईसाठी निघणार आहोत. तर आम्ही यावेळी आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार आहोत. अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे. ” अशी भूमिका मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी मांडली आहे.
” सरकारच्या हातात 2 दिवस आहेत. आडमुठी भूमिका सोडावी. मराठा आणि कुणबी एकच आहेत, सरकारने मान्य करावं. सातारा, औंध आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झालीच पाहिजे, हैदराबाद गॅझेट सरकारने स्वीकारलं पाहिजे, फडणवीसांचं नाही ऐकायला आम्ही तयार नाही.” असंही यावेळी जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने मनोज जरांगेंनी फडणवीस सरकारला 48 तासांत अल्टिमेटम या निमित्ताने दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एकंदरीत मुंबईतील आंदोलनावर जरांगे ठाम असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.





