शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे या गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या खटल्यावर अखेर निर्णायक सुनावणीची तारीख निश्चित झाली आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात हा खटला ८ ऑक्टोबर रोजी अंतिम टप्प्यात ऐकला जाणार असून, याच दिवशी निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा पेच सुटणार की अधिक गडद होणार याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
प्रकरण निकाली काढण्याची ठाकरे गटाची मागणी
शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादावर लवकरात लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. या संदर्भात दाखल याचिकेवर मागील १४ जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवरच सुनावणी व्हावी असे स्पष्ट केले होते. तसेच, ऑगस्ट महिन्यात सुनावणी सुरू करण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्याच काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादावर घटनापीठासमोर सुनावणी ठरल्याने शिवसेना प्रकरण मागे ढकलले गेले.
शिवाय, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीत एक महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता याप्रकरणाची मुख्य सुनावणी ऑक्टोबर महिन्यात घेऊ, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यामुळे हे प्रकरण निकाली निघण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
न्यायालय प्रकरण निकाली काढण्याच्या तयारीत
सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची मुख्य सुनावणी पूर्ण करेपर्यंत महानगरपालिका निवडणूक येऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय राखून ठेवू शकते. परंतु, निवडणूक संपल्यानंतर म्हणजे 2025 हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. ही ठाकरे गटासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत या प्रकरणाला दोन वर्षे झाली असून आता या खटल्याचा सोक्षमोक्ष लावायचा, असे संकेत दिले. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार का परत उद्धव ठाकरे यांना परत मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.आगामी महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरेतर हा निर्णय येणे अत्यंत महत्वाचे आहे. शिवाय हा निर्णय राजकीय दृष्टीने देखील महत्वाचा आहे. त्यामुळे या शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाच्या बाबतीत ऑगस्ट महिन्यात कोणती घडामोड घडते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





