राज्याच्या राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावणारी एक बातमी काही वेळापूर्वी समोर आली. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, भाजपच्या दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं बैठक पार पडली. त्यामुळे या भेटीनंतर आता राज्यात अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. भेटीत नेमकी काय चर्चा झाली असेल? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. राज्यातील अनेक वादग्रस्त मंत्री आणि आमदारांची विकेट पडणार की काय असे सवाल देखील या निमित्ताने निर्माण होत आहेत.
दिल्लीतील भेट आणि राजकीय चर्चांना उधाण
राज्यात सध्या काही मंत्र्यांची आणि आमदारांची प्रकरणे गाजत आहेत, व्हिडीओ देखील समोर आले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचा दबाव वाढला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. तरी राज्यात काही वादग्रस्त मंत्री आणि आमदारांमुळे सरकारची चांगलीच बदनामी झाली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेतील काही आमदार आणि मंत्री तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही मंत्री आणि आमदारांचे वर्तन मुख्यमंत्र्यांना पटलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं बैठक झाली.
संजय राऊतांचे ‘ते’ भाकित खरे ठरणार?
” मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे. यासंदर्भात माझ्याकडे माहिती आहे. शेतकऱ्यांना भेटायला कृषिमंत्र्यांना वेळ नाही. पण ऑनलाइन गेम खेळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. छत्तीसगडमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई झाली तशी आपल्याकडे होत नाही.” असा दावा खासदार संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी केला होता. काही मंत्री आणि आमदारांना गाशा गुंडाळावा लागेल असे राऊतांनी म्हटले होते. आता संजय राऊतांचे ते भाकीत खरे ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मंत्री, लोकप्रतिनिधींचे कारनामे सुरूच
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अवस्था झाली ही येड्याची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी झाली आहे. कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार बनियानवर खाली उतरून कँन्टिन वाल्यांना मारहाण करतो. विधीमंडळाच्या प्रांगणात गँगवारसारखी भांडणं होतात. कधी एखादा मंत्री करोडो रूपये मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो. तर आता तर हद्द विधीमंडळाच्या सभागृहामध्ये कृषीमंत्री रम्मी गेम खेळताना दिसतात. नुकताच कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानभवनातील रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाला आता वेगळीच गती मिळाली आहे. आता कुणावर काय कारवाई होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Had a courtesy meeting with our leader, Hon Union Home Minister, Minister of Cooperation @AmitShah ji in New Delhi.
आमचे नेते, मा. केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री अमितभाई शाह यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. #NewDelhi #Maharashtra pic.twitter.com/BLxef0SB1C— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 25, 2025





