नवी दिल्लीत आगामी काही दिवसांत इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक 7 ऑगस्ट रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीला आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहतील. बैठकीनंतर रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांना या रात्रीच्या जेवणाच्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. ही रात्रीची डिनर डिप्लोमसी राहुल गांधी यांच्या 5 सुनहरी बाग रोड येथील नवीन अधिकृत निवासस्थानी होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत नेमकी काय रणनिती ठरणार?
भाजपविरोधात एकजुटीने उभे राहण्यासाठी स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीची राजकीय हालचाल पुन्हा एकदा वेग घेत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्यासाठी आता या आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून याच अनुषंगाने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्रातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार असून इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत ते महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे हे 6 ते 8 ऑगस्ट या तीन दिवसांसाठी दिल्लीत असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडीतील इतर प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. वि
सध्या सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (एसआयआर), महाराष्ट्रातील मतदार यादीतील कथित फेरफार, ऑपरेशन सिंदूर, भारत-अमेरिका व्यापार करार आणि ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ धमकी यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून भारत आघाडीची ही दुसरी बैठक आहे. या सर्व मुद्द्यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.





