MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राहुल गांधीच्या संपर्कात? ; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने एकच खळबळ!

Written by:Rohit Shinde
Published:
दक्षिणेच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. त्यामध्ये आंध्राचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केलेल्या एका दाव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. सविस्तर जाणून घेऊ...
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राहुल गांधीच्या संपर्कात? ; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने एकच खळबळ!

केंद्रातील मोदी सरकार सध्या आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर उभे आहे. अशा परिस्थितीत चंद्राबाबूंनी साथ सोडली तर मोदी सरकारला मोठा धोका संभवतो. अशा वातावरणात आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या दाव्याने एकच खळबळ माजली आहे. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आंध्र प्रदेशातील मतदानातील तफावतींबद्दल चर्चा टाळल्याबद्दल जोरदार टीका केली. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याचा सनसनाटी दावा केला आहे. विशेष म्हणजे भाजपकडे बहुमत नसल्याने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत.  अशा परिस्थितीत रेड्डींच्या दाव्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

जगनमोहन रेड्डींचा दावा नेमका काय?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी मत चोरी करून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. 100 हून अधिक जागांवर भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने घोटाळा केल्याचा सुद्धा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी आंध्रबद्दल बोलत नाहीत, कारण चंद्राबाबू तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत हॉटलाइनद्वारे त्यांच्याशी संपर्कात आहेत. तर, राहुल गांधींबद्दल मी काय बोलावे, जे स्वतः प्रामाणिक नाहीत?, अशी टीका रेड्डी यांनी केली.  आंध्र प्रदेशातील मतमोजणीमधील तफावतीवर रेड्डी यांनी विशेष भर दिला.

चंद्राबाबू भाजपासाठी किती महत्वाचे?  

चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशातील तेलगू देशम पक्षाचे (TDP) प्रमुख आणि अनुभवी राजकारणी आहेत. केंद्र सरकारसाठी त्यांचे महत्त्व प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील राजकीय समीकरणांवर आधारित आहे. भारतीय जनता पक्षाला (भाजप) दक्षिणेत विशेषतः आंध्र प्रदेशात राजकीय बळकटी मिळवण्यासाठी TDPसोबतचे संबंध महत्त्वाचे ठरतात. चंद्राबाबूंचा अनुभव, प्रशासनातील कार्यकुशलता आणि राज्यातील जनाधार भाजपासाठी निवडणुकीत उपयोगी पडू शकतो. केंद्र सरकारला राज्यातील प्रकल्प, विशेषतः पॉलावरम प्रकल्प आणि राजधानी अमरावतीशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी TDPसोबतचा संवाद गरजेचा असतो. याशिवाय, संसदेतील विधेयके पारित करण्यासाठी किंवा विशेष धोरणांना पाठिंबा मिळवण्यासाठी अशा प्रादेशिक पक्षांचे सहकार्य महत्त्वाचे असते. त्यामुळे चंद्राबाबू नायडू हे केवळ आंध्र प्रदेशापुरतेच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातही भाजपासाठी रणनीतीच्या दृष्टीने प्रभावी घटक मानले जातात.