बापाने 70 हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही, पार्थने व्यवस्थित प्रशिक्षण घ्यावं

Published:
आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील ३ एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले
बापाने 70 हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही, पार्थने व्यवस्थित प्रशिक्षण घ्यावं

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महार वतनाची १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने फक्त ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या जमिनीची 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी सुद्धा न भरता अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा सर्व व्यवहार करण्यात आल्याचा आरोप झाला. अजित पवारांनी याप्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट देत जमिनीचा व्यवहारच झाला नसल्याचे म्हटलं. त्यानंतर हा जमिनीच्या खरेदीचा व्यवहार रद्द करत येत असल्याचं अमेडिया कंपनीने जाहीर करत तसं पत्र संबंधित विभागाला दिलं. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे, याच दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे.

लक्ष्मण हाके यांची पोस्ट जशीच्या तशी

पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा.

( पवार पॅटर्न बारामती )

१८०० कोटींची महार वतनाची जागा ३०० कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारने केलं. आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील ३ एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले अशी पत्रकार परिषद बहुजन नेते काळुराम चौधरी यांनी केली म्हणजे बारा खडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली.

बापाने ७० हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात सापडले. ‘नया है वह’ म्हणत त्यांना सोडूनच दिले जाईल. नवा जमिन घोटाळा करताना पार्थ पवारांनी जुन्या चुका करु नयेत.

उदा.

-एक लाख रुपये भागभांडवल असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ३०० कोटींचा व्यवहार करु नये.

-शेकडो कोटींचा व्यवहार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करु नये.

-सरकारी खात्याची जमिन खासगी कंपनीकडे घेताना अधिकची काळजी बाळगावी.

-भविष्य काळात मरिनड्राईव्ह, ताज हॉटेल, मलबार हिल्स, विधानभवन अशा जागांवर हात मारावा. किरकोळ महार वतनांच्या. जमिनींकडे दुर्लक्ष करावे.

प्रत्येकाकडे कला असते. पवारांच्या हातता जमिनी गायब करण्याची जादूची कांडी आहे. त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं. भविष्यात १५, २० हजार कोटींच्या जमिन खरेदीचा घोटाळा करावा.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेची शिखरं गाठली ती दलित, मुस्लीम,तओबीसी, उपेक्षित घटकांच्या नरडीवर टाच ठेवून. पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव हे आहे की सरंजामी पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे. पार्थ पवारने महार वतनाची जमिन कंपनीच्या नावे केली तेव्हा जणांना उचलून आणलं? किती लोकांच्या अनात माती कालवली नेमकं या प्रकरणात काय काय घडलं असेल याचं सत्य महाराष्ट्रा पुढे येईल असे वाटत नाही.

– लक्ष्मण हाके

अजित पवारांकडून मुलाची पाठराखण

दरम्यान या संपूर्ण जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांनी आपला मुलगा पार्थ पवारची पाठराखण केली आहे.हे प्रकरण उजेडात आल्यापासून मी अजून पार्थला भेटलेलो नाही. उद्या मी त्याच्याशी बोलेन. कितीही विश्वासू लोक असले तरी असे व्यवहार तज्ज्ञांशी चर्चा करुन घ्यायचे असतात. भले चार पैसे गेले तरी चालतील. शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल, असे अजित पवार यांनी म्हटले.

 

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews