लोकसभेला मनोज जरांगेंनी घेतलेल्या भुमिकेमुळे महायुतीला चांगलाच फटका बसला होता. तर विधानसभेला मात्र तितकासा प्रभाव दिसला नाही. आरक्षणाचा लढा जरांगे पाटील यांनी सुरू केला आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलेलं असतानाच जरांगे पाटील यांनीच भूमिका स्पष्ट केली आहे.
समाज ठरवेल ती भूमिका -जरांगे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार? याबाबत प्रश्न विचारला असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीतला निर्णय समाज घेईल. मी, याबाबत भूमिका घेण्याचा अक्रस्ताळेपणा करणार नाही. समाजाला जो निर्णय वाटेल तो समाज घेईल फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत.” असे यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी जो आंदोलनाचा लढा आम्ही उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून आजचा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद आहे. आरक्षणाच्या लढ्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईला येणार आहेत असं ते म्हणाले. आज मनोज जरांगे पाटील हे भोर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रायरेश्वर किल्ल्याला भेट दिली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आरक्षणाचा लढा तीव्र होणार -जरांगे
यावेळी आगामी काळात मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करणार असल्याची भुमिका मनोज जरांगे पाटलांनी मांडली आहे. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा आरक्षण आम्ही घेणार नाही. 29 ऑगस्टला चलो मुंबईच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून सुरू होणार असून, तीन दिवसांनंतर मुंबईत आझाद मैदान व शासन दरबारी अर्थात मंत्रालयावर मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. जर आंदोलकांवर अन्याय झाला, तर गावागावातले मुख्य व दुय्यम रस्ते बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.





