मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, जरांगे पाटलांना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. आज शिवनेरी किल्ल्यावरून निघण्यापूर्वी मनोज जरांगेंनी उपस्थित समुदायाला संबोधित केले. शिवाय, यावेळी मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील शेवटचा संदेश दिला. आज जरांगेंचा मोर्चा राजुगूरूनगर, चाकण, लोणावळा, पनवेलमार्गे मुंबई असा पुढे सरकणार आहे. शिवाय आज ते मुंबईत रात्री उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे.
जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना शेवटचा संदेश
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे पाटील आता शिवनेरीवरून पुढे सरकत आहेत. शिवनेरीवर दाखल होताच मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली पाहिजे, अशी भावना मांडली. तसेच “आम्ही मुंबईला जाणारचं,” असंही मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, आडमुठी भूमिका सोडून द्या, असंही मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजूनही संधी आहे. या संधीचं सोनं करा, असं मनोज जरांगे म्हणाले. तुम्ही आमचे वैरी नाहीत. फक्त मराठाविरोधी भूमिका सोडा, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. तुम्ही मराठांच्या मागण्यांची अंमजबजावणी करा…हेच मराठे तुम्हाला मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही, हा आमचा शब्द आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
आता माघार नाही; जरांगेंची भूमिका
जरांगे पाटील यांनी मोठी मागणी करत म्हटले की, मागण्या मान्य होईपर्यंत आम्हाला परवानगी द्यावी. गोळ्या झाडल्या तरीही आता आम्ही मागे हटणार नाहीत. आज रात्री शंभर टक्के आम्ही आझाद मैदानावर पोहोचणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पोहोचण्याच्या अगोदरच मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ते अजूनही ठाम आहेत.
जरांगेंच्या मोर्चाचे आजचे नियोजन कसे?
जरांगेंचा मोर्चा राजुगूरूनगर, चाकण, लोणावळा, पनवेलमार्गे मुंबई असा पुढे सरकणार आहे. शिवाय आज ते मुंबईत रात्री उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. काही मराठा बांधव आधीपासूनच मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आज रात्री हा मोर्चा नवी मुंबईत आल्यावर अभुतपूर्व गर्दी निर्माण होण्याची शक्यता आहे.





