महादेव मुंडे यांची 20 महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीत निर्घृण हत्या झाली होती. मात्र तरी या प्रकरणाच्या तपासाला कोणतीही गती मिळत नसल्याचे चित्र सद्यस्थितीला महाराष्ट्रात आहे. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. आज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आठ दिवसांच्या आत या प्रकरणात योग्य ती कारवाई करा अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.
तात्काळ कारवाई करा -जरांगे
पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर जरांगे म्हणाले की, ” आम्ही कायम महादेव मुंडे यांच्या कुटुंबासोबत राहणार आहोत आणि न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही. हत्या किती क्रूरपणे झाली हे कुणाला माहीत नव्हते, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना माहीत झाले. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर आरोपी आठ दिवस मांस घेऊन फिरत होते. मुख्यमंत्री यांना मान खाली घालयला लावणारी बाब आहे. कारण तुमच्या राज्यात महादेव मुंडेचा खून होतो आणि ते आरोपी दोन वर्षे सापडत नाहीत. असे मुडदे पडत असतील तर बीड जिल्ह्यातील लोकांनी आता जागे झाले पाहिजे.”
“महादेव मुंडे प्रकरणात बीडच्या जनतेने रस्त्यावर उतरायचे ठरवले किंवा आंदोलन करायचे ठरवले तर मुख्यमंत्र्यांना अवघड जाईल, मी मनोज जरांगे तुम्हाला विनंतीपूर्वक सांगत आहे की, आठ दिवसाच्या आत एसआयटी गठीत करा, त्यात मुंडे कुटुंबाचे माणसे घ्या, आरोपी अटक केल्यानंतर मुंडे कुटुंबांना सरकारी वकील द्या. या कुटुंबाला शंभर टक्के धोका आहे आणि त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.” अशा प्रकारची मागणी यावेळी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं काय?
व्यवसाय करणारे महादेव मुंडे यांची 21–22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयाच्या बाहेर धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजनुसार तपासाच्या दुसऱ्या दिवशी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. तपास सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत सुरू झाला, पण आरोपी कोण आहेत व हत्येचे कारण काय याबाबत पुरावा न मिळाल्यामुळे तपासाची प्रगती थांबली. तब्बल 18 महिन्यांनीही आरोपींना अटक नाही; पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप या प्रकरणात केला जात आहे. त्यामुळे महादेव मुंडे प्रकरणाचे गुढ मोठे आहे. याबाबत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पत्नी या नात्याने आता पाठपुरावा सुरू केला आहे. अशात त्यांना आत्मदहन आणि विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.





