मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला गंभीर इशारा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आता पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांसह ते मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केला पण आता ती चूक करू नका असा इशारा यावेळी जरांगे यांनी सरकारला दिला आहे. मराठा आंदोलकांनी कुणी कुणाची वाट पाहू नका. असे आवाहन जरांगेंनी केले आहे.
पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून सुरू होणार असून, तीन दिवसांनंतर मुंबईत आझाद मैदान व शासन दरबारी अर्थात मंत्रालयावर मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. जर आंदोलकांवर अन्याय झाला, तर गावागावातले मुख्य व दुय्यम रस्ते बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘आता माघार नाही…’ -जरांगे
“आता कोणतीही बैठक होणार नाही. तालुक्यात आणि जिल्ह्यात कोणीही वाट बघायची नाही. आता सगळ्यांनी सरळ मुंबईला निघायचं आहे. माझं शरीरही साथ देत नाही आहे. आरक्षणासाठी 2 वर्ष संधी दिली. त्यामुळे सरकारला आता संधी देणार नाही. ते कितीही वेळ अभ्यास करतील. त्यांनाच अभ्यास करायचा होता तर समिती कशाला नेमली? आम्हाला, समितीला, आयोगाला, घटनातज्ज्ञांना अभ्यास करायचा आहे. असं म्हणत सरकार नाटकं करत आहे.” असे जरांगेंनी म्हटले.
ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघायचे आहे. कुठेही न थांबता 28 ऑगस्टला रात्री मुंबईत पोहचायचे आहे. मुंबईतील सर्वच लोकांनी मागे आपली सेवा केली, त्यात परप्रांतीय लोकांनी सुद्धा आपली सेवा केली आहे. पावसाचे दिवस असून मला तुम्ही मुंबईत सोडायला या, पुढचं मी पाहतो. आता अशी संधी पुन्हा मिळणार नसून विजयाची चाहूल लागली आहे, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे जरांगेंनी मराठा बांधवांसह पुन्हा एकदा आरक्षण मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.





