मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकदा उपोषण आणि मोठी आंदोलने मनोज जरांगेंनी उभारली. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली असून, येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. अशा परिस्थिती जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यातील वादाला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना डिवचले आहे. नेमके भुजबळ काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊ…
जरांगेंची हवा संपली -भुजबळ
मनोज जरांगे पाटलांवर ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळांनी जोरदार टीका केली आहे. ” मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मी थोडी देखील किंमत देत नाही, जरांगे पाटील यांच्यामध्ये काही दम राहिलेला नाही, त्यांची सगळी हवा गेलेली आहे. मराठा समाजाला सरकारने 10 टक्के आरक्षण दिलेलंच आहे, मराठा समाजाला देखील कळून चुकले आहे की, जरांगेंमध्ये आता दम उरला नाही,” अशा शब्दांत भुजबळांनी भाष्य केले.
“गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांना सांगितलं उमेदवार उभे करायचे आहेत.सर्वांचे फार्म मागितले. मग म्हटले ठरवतो, आणी नंतर सांगितले माघार घेतली. ते फक्त माझ्या मतदार संघात येवल्यामध्ये आले, पण लोकांनी काही त्यांचं ऐकलं नाही, मला चांगल्या मतांनी निवडून दिलं, ” असेही भुजबळ म्हणाले. यानिमित्ताने छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांच्या हातात आयते कोलित दिले आहे. आता मनोज जरांगे पाटील देखील आगामी काळात भुजबळांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणासाठी एल्गार!
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून सुरू होणार असून, तीन दिवसांनंतर मुंबईत आझाद मैदान व शासन दरबारी अर्थात मंत्रालयावर मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. जर आंदोलकांवर अन्याय झाला, तर गावागावातले मुख्य व दुय्यम रस्ते बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.





