Raj Thackeray On Baba Adhav : अशी माणसं पुन्हा घडावीत!! बाबा आढाव यांच्या निधनानंतर राज ठाकरे भावुक

Published:
बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं
Raj Thackeray On Baba Adhav : अशी माणसं पुन्हा घडावीत!! बाबा आढाव यांच्या निधनानंतर राज ठाकरे भावुक

Raj Thackeray On Baba Adhav : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं काल रात्री निधन झाले. बाबा आढव हे कष्टकरी आणि श्रमिकांचे नेते म्हणून ओळखले जात होते. काल वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबा आढाव यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. बाबा आढाव यांच्या निधनामुळे असंघटित कामगारांचा आवाज बुलंद करून त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा नेता हरपला अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. बाबा आढाव यांच्यासारखी माणसे पुन्हा घडावीत हीच इच्छा असं राज ठाकरे यांनी म्हंटल.

काय म्हणाले राज ठाकरे ? Raj Thackeray On Baba Adhav

ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकार्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव. बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतलं. महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य की, सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेली माणसं, उच्चशिक्षित आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकले असते अशी माणसं सामाजिक क्षेत्रांत आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का ? माहित नाही. हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे, स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. Raj Thackeray On Baba Adhav

असो, पण रिक्षा पंचायत असो, हमाल पंचायत असो की १९७२ साली एक गाव एक पाणवठासाठी उभी केलेली चळवळ असो, की १९६९ ला राज्यात मंजूर झालेला महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा असो, हे बाबांचं मोठं योगदान. बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला. आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांच शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे. आणि जिला सरकारचं समर्थन आहे. सध्या तर सरकारं ही उद्योगशरण आहेत आणि कामाचे तास, वेळा याबाबत सरकार उद्योगजगताला शिस्त देखील लावू शकत नाही, हे नुकत्याच विमान कंपनीच्या उदाहरणातून दिसलं. यामुळे संघटित असो की असंघटित कामगार किंवा नव्याने उदयाला येत असलेला ज्याला ‘गिग वर्कर’ म्हणता येईल असे सगळेच असुरक्षतितेच्या गर्तेत सापडले आहेत.

अशी माणसं पुन्हा घडावीत –

बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. हे खरं समाजकारण जे एनजीओ संस्कृती उदयाला येण्याच्या आधीच्या काळातलं, जिथे प्रत्येक विषयात मतं होती आणि ठोस भूमिका होती. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे, त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा. बाबा आढावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews