MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

रेव्ह पार्टीमुळे पती अडचणीत; रोहिणी खडसे शरद पवारांना भेटल्या, पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी?

Written by:Rohit Shinde
Published:
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांना वाचविण्यासाठी रोहिणी खडसेंची धडपड सुरू आहे. आज त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली.
रेव्ह पार्टीमुळे पती अडचणीत; रोहिणी खडसे शरद पवारांना भेटल्या, पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी?

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर चांगलेच अडचणीत आले आहेत. पतीला प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पत्नी रोहिणी खडसेंची धावपळ सुरू आहे. पुण्यातील खराडी भागात ही पार्टी सुरू होती आणि रूम देखील खेवलकरांच्या नावानेच बुक करण्यात आली. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ देखील पुढे आले. धक्कादायक बाब म्हणजे पुरूषांसोबतच काही महिलांचा देखील या रेव्ह पार्टीत सहभाग होता. सध्या रेव्ह पार्टी प्रकरणी सात जण कोठडीत असून त्यांना पुणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामध्ये प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मेसेजेस सापडल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

रोहिणी खडसे शरद पवारांना भेटल्या!

आता रोहिणी खडसे या थेट शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याकडून पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप करण्यात आले. पुणे पोलिसांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. पुणे पोलिस कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. यादरम्यान आमदारर रोहित पवार यांनी देखील पुणे पोलिसांवर आरोप केले.

सत्य योग्यवेळी समोर येईल -रोहिणी खडसे

सत्य योग्यवेळी समोर येईल, असा विश्वास रोहिणी खडसेंनी व्यक्त केला आहे. पती प्रांजल खेवलकरला अटक झाल्यानंतर तब्बल 24 तास रोहिणी खडसे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ही दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्य लवकरट बाहेर येईल, असे म्हणत पतीच्या फोटोसह पोस्ट शेअर केली. आता प्रांजल खेवलकरला जामीन कधी मिळतो, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. कोर्टातील सुनावणीवेळी देखील रोहिणी खडसे कोर्टात उपस्थित होत्या.

त्यावेळी पुण्यात नेमकं काय घडलं?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यात ड्रग्ज पार्टीत अटक झाली.पार्टी करण्याची हौस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले. या दोघांचीही पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे .श्रीपाद यादववर या आधी बेटींग प्रकरणात गुन्हे दाखल असून त्याला अनेकदा अटक देखील झाली आहे. तर निखिल पोपटाणी हा सिगारेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटींगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो. या दोघांच्या संपर्कात आल्यानेच प्रांजल यांच्या अडचणी वाढल्या.

या दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले. शनिवारी देखील हे दोघे पार्टीत सहभागी झाले. यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरुन दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समधे अंमली पदार्थ सापडले. अंमली पदार्थ सापडल्यानेच या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले, आणि राजकीय रंग देखील या प्रकरणाला आला.