2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीमध्ये मोठा घोळ करण्यात आला असून त्याचा फायदा भाजपला मिळाला आणि त्यामुळेच राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले असा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातोय. आज शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅण्ड नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही याच मुद्द्यावर भाष्य करताना चक्क महाभारतातील धृतराष्ट्राचे उदाहरण देत भाजप वर हल्लाबोल केला.धृतराष्ट्राला १०० पोरं कशी झाली, असा प्रश्न मला पडायचा. आता मतदारयादी तपासा! एकेका बापाला ४० पोरं, पण हा बाप ब्रह्मचारी आहे असे संजय राऊत यांनी म्हटले.
काय म्हणाले संजय राऊत? Sanjay Raut
आज मुंबईमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाजपला शिंगावर घेतलं. धृतराष्ट्राला १०० पोरं कशी झाली, असा प्रश्न मला पडायचा. आता मतदारयादी तपासा! एकेका बापाला ४० पोरं, पण हा बाप ब्रह्मचारी आहे. मोदींच्या मतदारसंघात ७० असे बाप आहेत. भाजप यामुळेच जिंकला. आता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा मतदार यादीत घोटाळे सुरू आहेत. कारण मुंबईवर यांची वाकडी नजर आहे. परंतु तुमचे कितीही कौरव येऊ द्या, मुंबई महापालिकेत विजय आमचाच होईल तसं संजय राऊतांनी ठणकावून सांगितले.

मोदी शहांवर टीकास्त्र
यावेळी आपल्या भाषणात संजय राऊतांनी (Sanjay Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही चौफेर टोलेबाजी केली. पहलगाममध्ये २६ महिलांचे कुंकू पुसून अतिरेकी पळून गेले, हे तुमचे यश?” असा सवाल करत संजय राऊत यांनी अमित शहांवर टीकास्त्र सोडलं. एवढेच नव्हे तर आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही इथे आलात. मराठी माणसाला हद्दपार कराल तर तुमचे स्वर्णमहाल जागेवर राहणार नाहीत.” मोदी आणि त्यांचे १०० बाप खाली आले तरी शिवसेना आमचीच राहील. ट्रम्पला झोपेतून विचारले तरी ते सांगतील शिवसेना कुणाची, पण सुप्रीम कोर्टाला अजून सांगता येत नाही, असे म्हणत संजय राऊतानी निवडणूक आयोगाला सुद्धा फटकारले.