MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता; कोणत्या विषयांवर चर्चा होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार असल्याचे समजते.
राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता; कोणत्या विषयांवर चर्चा होणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार असल्याचे समजते. या भेटीत राज्यातील विविध राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, राज्यात विरोधक आणि सत्ताधारी असा संघर्ष उफाळून आलेला असताना या भेटीचे महत्व मोठे आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनकाळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

सत्ताधारी-विरोधक संघर्षावर चर्चा अपेक्षित

विधिमंडळातील नितीन देशमुख मारहाण प्रकरण आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पावसाळी अधिवेशन प्रचंड गाजले होते. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच सर्वपक्षीय आमदारांना सुनावले होते. ‘राज्यातील जनता आपल्याला शिव्या देत आहे. आमदार माजले आहेत’, असे जनता बोलत असल्याचे खडेबोल देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले होते. या सगळ्या वादांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील वातावरण कलुषित झाले आहे.

वादग्रस्त नेत्यांवर काही कारवाई होणार?

शनिवारी सकाळी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते असलेल्या नितीन देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली. नितीन देशमुख हे शरद पवारांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी नितीन देशमुख यांनी विधिमंडळाच्या लॉबीत घडलेल्या हाणामारीबाबत शरद पवार यांना माहिती दिली असण्याची शक्यता आहे. नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे यानंतर खुद्द आमदार गोपीचंद पडळकर अथवा त्यांचा कार्यकर्ते सर्जेराव टकले याच्यावर काही कारवाईचे पाऊल उचलले जाते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वादादीत मंत्री, आमदार सध्या राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पुढे त्यांच्यावरील कारवाईच्या अनुषंगाने देखील चर्चा या भेटीत अपेक्षित आहे. माणिकराव कोकाटेंना कृषिमंत्रीपद गमावावे लागण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. त्यामुळे या विषयावर देखील पवार-फडणवीस भेटीत चर्चा अपेक्षित आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांचे काय होणार, हे पाहणे देखील या निमित्ताने महत्वाचे ठरणार आहे.