आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणतेही पक्षाशी आघाडी करा असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. शरद पवारांच्या विधानाचा थेट अर्थ असा की एकवेळ अजित पवार चालतील, एकनाथ शिंदे चालतील परंतु भाजप नको. पवार यांच्या या आदेशाचा प्रत्यय पिंपरी चिंचवड मध्ये पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी करण्यासाठी शरद पवार गटाने एक पाऊल पुढे टाकल आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
काय म्हणाले तुषार कामठे ?
भाजपाला थांबवण्यासाठी जे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे पक्ष आहेत. जे आमच्या विचारांचे पक्ष आहेत. त्यांच्यासोबत आमची युती होऊ शकते. म्हणजेच महाविकास आघाडी होऊ शकते. भ्रष्टाचार करत भाजपने पुणे शहराचं वाटोळं केलं आहे. त्यामुळे भाजप विरोधात आम्ही ताकतीने लढणार आणि त्यांना थांबवणार. त्यासाठी एक पाऊल मागे येण्याची पण आमची तयारी असेल. मग तो जागावाटपचा मुद्दा असेल किंवा आणखी काही विषय असतील, वेळप्रसंगी आम्ही थोडा कमीपणा घेऊ पण परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी एक पाऊल पुढे जाऊ आणि भाजपाला थांबवू असे म्हणत तुषार कामठे यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पवारांची चाल भाजपला गुंडाळणार –
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानले जातात. कोणता पत्ता कधी ओपन करण्याचा, कोणाला पुढे करून कोणाची विकेट काढायची हे पवारांना चांगलंच माहित आहे. आज त्यांच्या पक्षाची अवस्था बिकट आहे. अनेक सहकारी पक्ष सोडून महायुतीत जाण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी कुंपणावरील या पुढाऱ्यांना पक्षात थांबवून ठेवण्यासाठीच तर शरद पवारांनी कोणाशीही आघाडी करा पण भाजपसोबत जाऊ नका अशा सूचना दिल्या नाहीत ना अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच या निवडणुकीच्या माध्यामातून पवार काका पुतणे पुन्हा एकत्र येणार का? दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का? याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष्य आहे.











