भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठं वादळ उठलं आहे. पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात अत्यंत खालच्या भाषेत टीका केली, तसेच राजारामबापू पाटलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याचा वाळवा तालुक्यात प्रचंड निषेध व्यक्त झाला असून, विरोधकांकडून पडळकरांवर हल्लाबोल सुरू आहे. यामध्ये बापू बिरू वाटेगावकरांच्या मुलाने म्हणजे शिवाजी वाटेगावकरांनी गोपीचंद पडळकरांना सज्जड दम दिला आहे.
“अंगावर कपडे सुध्दा ठेवणार नाही…”
या प्रकरणानंतर बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी थेट पडळकरांना सज्जड दम दिला आहे. “तुला समाजात काही काडीचीही किंमत नाही, जयंत पाटलांविरोधात बोलायला तू कोण? तुला कपडे काढूनच पाठवतो. जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवच, अशा कठोर शब्दांत वाटेगावकरांनी पडळकरांवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचे कान टोचले
एकीकडे पडळकरांच्या विधानावरून राजकीय वातावरण तापलेले असाताना फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना पडळकर हे तरूण नेते आहेत. अनेकदा ते बोलताना आपल्या अॅग्रेशनचा काय अर्थ निघेल हे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांना सांगितले की, आपण अॅग्रेशन लक्षात घेऊनच बोलले पाहिजे असे फडणवीस म्हणाले. फडणवीसांची प्रतिक्रिया इथपर्यंत ठिक होती. पण, पुढे याच विषयावर बोलताना ते म्हणाले की, पडळकरांना भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघत असतील याचा विचार करायला हवा, असा सल्ला मी त्यांना दिल्याचे फडणवीस म्हणाले.
पडळकरांची सातत्याने बेलगाम वक्तव्ये
सांगलीमध्ये जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हा वाद चांगलाच पेटल्याचं दिसून येतंय. गोपीचंद पडळकरांनी या आधीही सातत्याने जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्याला जयंत पाटलांनीही उत्तर दिलं. पण गोपीचंद पडळकरांनी जतमध्ये केलेल्या वक्तव्यावर आता वाद होण्याची शक्यता आहे. या सततच्या आरोप-प्रत्यारोपामुळे दोघांचा वैयक्तिक वाद राजकीय रंग घेतो. ग्रामीण भागात व विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या वादाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. दोन्ही नेत्यांचा संघर्ष हा केवळ राजकीय न राहता समाजघटकांच्या भावनांनाही स्पर्श करणारा ठरतो, म्हणूनच या वादाकडे माध्यमे व जनता बारकाईने लक्ष देतात. आता पडळकरांनी उधळलेल्या मुक्ताफळांना जयंत पाटील नेमके काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.