दूध संघांच्या राजकारणाला ग्रामीण भागात मोठे महत्व असते. अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलने जोरदार विजय मिळवला. त्यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. 15 पैकी तब्बल 12 जागांवर त्यांच्या गटाने बाजी मारली आहे. पारनेर तालुका दूध संघ मागील 10 वर्षे बंद होता. चार वर्षांपूर्वी पुन्हा सुरू झाल्यानंतर सध्या दररोज 6,000 लिटर दूध संकलन सुरू आहे, तर पूर्वी हे प्रमाण 70,000 लिटर होते. विखे पाटील यांनी संघाचा कारभार पुन्हा शेतकरी व संचालकांच्या हाती देऊन, त्याला गतवैभव परत मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
विखेंची पारनेरमधील राजकीय पकड मजबूत
या दूध संघाच्या निवडणुकीत डॉ. विखे यांनी थेट मोर्चा हाती घेत, कार्यकर्त्यांची संघटित मोहीम राबवली. खासदार निलेश लंके यांच्या ‘सहकार’ पॅनलशी थेट मुकाबला करताना विखे पाटील यांना विद्यमान आमदार काशिनाथ दाते आणि भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले. परिणामी चुरशीच्या लढतीत विखे गटाने स्पष्ट आघाडी घेतली. या विजयामुळे सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील सहकारी क्षेत्रात आपला प्रभाव अधिक दृढ केला आहे. दूध संघाचा कारभार त्यांच्या जनसेवा पॅनेलकडे गेल्याने पुढील काही वर्षे तालुक्याच्या सहकार व राजकारणात विखे गटाचा दबदबा राहण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
लंकेच्या राजकारणाला उतरती कळा?
लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतरचा राजकीय पट पूर्णपणे बदलला. ज्या-ज्या ठिकाणी निलेश लंके यांचे वर्चस्व होते, तिथे-तिथे विजयाची पताका डॉ. विखेंच्या समर्थकांनी फडकवली. मग ती आमदारकीची निवडणूक असो किंवा विविध संस्थांच्या कारभारातील सत्ता असो, प्रत्येक ठिकाणी लंकेंना पराभवाची चव चाखावी लागली आहे. एकीकडे निलेश लंके खासदार झाले असले तरी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पाठोपाठ लंकेंना अनेक ठिकाणी पराभव पाहावा लागला. त्यामुळे पारनेर लंकेंच्या हातातून सुटत असल्याची चर्चा सुरू आहे.





