एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र येणार अशी चर्चा सुरु असतानाच आता ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना सुद्धा पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. होय, हे वाचून तुम्हाला पटणार नाही, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना फुटीनंतर प्रथमच दोन्ही गट एकत्र निवडणुका लढवतील आणि भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करतील.
काय आहे विषय ?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कणकवलीत “शहर विकास आघाडी” या नावाने नवीन आघाडी निर्माण होणार असून या आघाडीच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. या नव्या समीकरणासाठी कणकवली शहरात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर, आणि सतीश सावंत हे उपस्थित होते. या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकण्याची शक्यता आहे.

बैठकीत काय ठरलं?
स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दाखवूया, असा निर्धार दोन्ही गटाकडून या बैठकीत करण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेना फुटीनंतर सातत्याने ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका करताना आपण बघितलं आहे. मात्र आता प्रथमच हे दोन्ही गट एकत्र निवडणुक लढवताना दिसतील. संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. येत्या दोन दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या आघाडीच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण गरम झालं आहे.
दरम्यान, या संभाव्य युतीच्या शक्यतेवर बोलताना शिंदे गटाचे माजी आमदार राजन तेली यांनी म्हंटल कि, हो गळ्यांनी मिळून या ठिकाणी लढावं आणि शहर विकास आघाडी करावी असा प्रस्ताव आला आहे. मात्र अजून यावर कोणताही निर्णय झालेला नाही. हा प्रस्ताव वरिष्ठांपर्यंत पाठवण्यात आलेला आहे. गावातील प्रमुख मंडळींचा अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला आहे. मात्र अजून त्यावर निर्णय झालेला नाही. अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील.











