उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी उद्धव ठाकरेंनी पैठण तालुक्यातील नांदर गावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी केलेल्या विधानावर टीका केली. अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर संतापनजक विधान केले होते. त्यानंतर आज संवाद दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“कर्जमाफीसाठी आणि मदतीसाठी मुहूर्तमागे मुहूर्त काढत आहेत. पण मदतीच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे. आम्ही तुमच्यासोबत राहणार असे सांगत आहेत. पण आम्हाला जूनची मुदत मान्य नाही. कर्जमुक्ती करा. आताच्या आता करा. निवडणुकीसाठी कर्जमुक्ती केली आहे. खोटं बोलत आहेत. अजित पवार म्हणतात जिंकायचं म्हणून कर्जमुक्ती केली. अजित पवार बेधडक बोलत आहेत की जिंकायचं म्हणून कर्जमुक्ती केली. लोकांना तुम्ही हातपाय हलवायला सांगत आहात, मग तुम्ही काय हलवत आहात?” असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

“गेल्या आठवड्यात काही तरी होईल वाटलं होतं. सर्व एकजूट झाले होते. परत मुख्यमंत्र्यांनी गुळ लावला. कर्ज कसं फेडणार. पॅकेज ही थट्टा आहे. अर्धवट पॅकेज आहे. ते पॅकेजच नाहीये. पीक विम्याचे पैसे मिळाले नाही. कुणी पीक विमा भरला होता का. त्याची माहिती घेतली होती. ज्याने भरला त्याने सांगा, तुम्हाला नुकसानीची किती रक्कम मिळायला हवी होती,” असे सवाल ठाकरेंनी यावेळी केले.
अजित पवारांचं विधान काय?
सरकारकडून पुढील सहा महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. दुसरीकडे, याच मुद्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा बोलले आहेत. आज अजित पवार यांनी शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा ना? असे म्हटले आहे. यापूर्वी कर्जमाफीवरून अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन एक विधान केले होते. शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा ना? की सारखं माफ, सारखं फुकट, सारखं माफ, साहेबांनी एकदा कर्जमाफी दिली. आता आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो. त्यासाठी काही पैसे खर्च करावं लागतं ना? त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या टिप्प्णीचा आता अजित पवारांनी देखील चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवारांवर सध्या चोहोबाजुंनी टीका होताना दिसत आहे.