अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. बिहारच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये नेमके कुणाचे सरकार येणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये विविध सर्व्हेंच्या आकडेवारीतून नेमका काय अंदाज समोर येतो, ते सविस्तर जाणून घेऊ…
बिहारमध्ये कुणाचे सरकार येईल, अंदाज काय?
बिहारमध्ये विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेचे आकडे पाहिल्यानंतर काही बाबी प्रकर्षाने जाणवतात. ज्यातून अनेक धक्कादायक आकडेवारी समोर आली होती.

सर्वेक्षणामधील एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारबद्दल लोकांचे मत काय आहे? 48% लोकांनी स्पष्टपणे सांगितले की, बिहारमध्ये एक मजबूत सत्ताविरोधी लाट आहे. त्यामुळे यंदा बिहारमध्ये सत्तापालट होतो, की काय अशी चिन्हे दिसत आहेत. आकडेवारीनुसार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये सरकारविरोधी भावना सारखीच आहे. जी जवळपास 48% इतकी आहे.
हे सर्वेक्षण राहुल गांधींच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’नंतर झाले असले तरी या यात्रेचा RJD किंवा काँग्रेसला थेट फायदा होईल असे स्पष्टपणे दिसून येत नाही. मात्र या आकडेवारीवरून हे नक्कीच स्पष्ट होते की बिहारमध्ये सत्ताविरोधी लाट आहे. त्यामध्ये प्रशांत किशोर यांना कशा स्वरूपाचे यश मिळते, यावर बरीच गणितं अवलंबून असणार आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
मतचोरीचे गंभीर आरोप, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अनेक योजना, महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आलेले पैसे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान घेतलं जाईल. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दल यांनी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे भाजप हा सत्तेतला, तर राजद हा विरोधी बाकांवरील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप आणि राजदचे ७० पेक्षा अधिक आमदार विधानसभेत आहेत. दोन्ही बड्या पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे.
राज्यात एकूण ७.४३ कोटी मतदार आहेत. यामधील ३.९२ पुरुष आणि ३.५० कोटी महिला मतदार आहेत. ७.२ लाख दिव्यांग मतदार आहेत. राज्यातील तरुण मतदारांचा (२० ते २९ वर्षे) १.६३ कोटींच्या घरात आहे. तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या १४.०१ लाख इतकी आहे.











