आयपीएलमध्ये आज पंजाब आणि कोलकाता आमनेसामने, आव्हान कायम ठेवण्याचे लक्ष

Rohit Shinde

कोलकाता: आयपीएल 2025 चा हंगाम आता हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. काही संघांसाठी प्ले ऑफ्सची दारं उघडी झाली आहेत. तर काही संघ आपलं आयपीएलमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये पंजाब किंग्स आणि केकेआर देखील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी झगडत आहेत. केकेआर आणि पंजाब किंग्स या संघांमधील सामना आज कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांसाठी या सामन्यातील विजय महत्वाचा असणार आहे.

कोलकात वि. पंजाब, कोण जिंकणार?

केकेआरची या सीझनमधील वाटचाल खडतर राहिली आहे. या मोसमात केकेआरने 8 सामने खेळले असून पैकी अवघ्या 3 सामन्यांत संघाला विजय मिळवता आला आहे. संघ 6 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे यामध्ये काहीशी सुधारणा करण्याचा संघाचा मानस असेल, दुसरीकडे पंजाब किंग्स संघाची परिस्थिती तुलनेने काहीशी बरी आहे.

पंजाब किंग्सने या मोसमात 8 सामने खेळले आहेत, पैकी 5 सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाला विजय मिळवता आला आहे. संघांकडे सध्या 10 गुण आहेत. आयपीएल गुणतालिकेत संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. तसेच संघाचा नेट रन रेट 0.177 इतका आहे. त्यामुळे पंजाबला फक्त या सामन्यात विजय मिळवणे पुरेसे नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे संघासाठी आवश्यक आहे.

दोन्ही संघांमधील शेवटच्या 34 सामन्यांचा विचार केला असता लक्षात येते की,  34 पैकी कोलकाता क्नाईट रायडर्सने 21 तर पंजाबच्या संघाला अवघ्य़ा 13 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. एकंदरीत इतिहास पाहता आजच्या या सामन्यात कोलकात्याच्या संघाचे पारडे जड असणार आहे.

प्लेयिंग इलेव्हन

कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात यंदा संघाला फारशी दखलपात्र कामगिरी करता आलेली नाही. आज अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, आंद्रे रसेल, रिंकू सिंग यांना संघाची फलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल. तर दुसरीकडे कोलकात्याच्या गोलंदाजीत फारशी ताकद दिसत नाही.

तुलनेने पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल यांच्या बॅटमधून धावांची बरसात होणे पंजाबसाठी आवश्यक आहे, तर गोलंदाजांकडून विशेष अपेक्षा असणार आहेत. अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युजवेंद्र चहल यांना जबाबादारी घ्यावी लागेेल.

ताज्या बातम्या