IPL 2025: आयपीएलमध्ये आज मुंबई – लखनऊ आणि आरसीबी – दिल्लीचा सामना

Rohit Shinde

मुंबई: आयपीएल 2025 चा हंगाम आता ऐन रंगात आलाय, शेवटच्या टप्प्यातले सामने जिंकण्यासाठी सर्व संघ जोर लावत आहे. आज या सीझनमधील 45 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता होणार आहे. तर याचवेळी 46 वा सामना रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये खेळला जाईल, आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.

मुंबई वि. लखनऊ कोण जिंकेल?

आयपीएल 2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्सने जोरदार पुनरागमन केलं आहे. मुंबईचा संघा सध्या गुणतालिकेत 5 व्या स्थानावर आहे. यामध्ये मुंबईने या मोसमात खेळलेल्या 9 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवत 10 गुण मिळवले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने सलग विजय मिळवला आहे. मुंबई संघाचा नेट रन रेट देखील चांगला आहे. दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स आपलं या आयपीएल सीझनमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी झगडत आहेत. लखनऊने आजवर या मोसमात 9 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. संघ गुणतालिकेत सध्या 6 व्या स्थानावर आहे.

लखनऊ आणि मुंबई संघांचा विचार केला असता, शेवटच्या 7 सामन्यांपैकी मुंबईने अवघा 1 तर लखनऊने 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, त्यामुळे आजच्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचं पारडं जड मानलं जात आहे.

दिल्ली वि. बंगळुरू कोण जिंकेल?

आजचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळला जात आहे. दिल्ली आणि बंगळुरू दोन्ही संघांनी या सिझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या सीझनमध्ये खेळलेल्या 8 पैकी 6 सामने जिंकत दिल्लीने गुणतालिकेत दुसरे स्थान कायम ठेवले आहे. संघांची प्ले ऑफ्सची आशा कायम आहे.दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स संघाने देखील सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या सीझनमध्ये खेळलेल्या 9 पैकी 6 सामन्यांमध्ये बंगळुरूने विजय मिळवला असून संघ गुणतालिकेत 3 ऱ्या स्थानावर आहे.

दोन्ही संघाचा इतिहास पाहिला असता शेवटच्या 32 सामन्यांपैकी आरसीबीने 19 तर दिल्लीच्या संघाने 12 सामने जिंकले आहेत, त्यामुळे बंगळुरूचे पारडे आज जड मानले जात आहे.  दोन्ही संघाच्या खेळाडूंना देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

ताज्या बातम्या