आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स कितव्या स्थानी? गुणतालिकेची स्थिती काय? जाणून घ्या

आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे. हंगामाची सुरुवात त्यांच्या दृष्टीने फारशी चांगली नव्हती, पण त्यानंतर त्यांनी शेवटच्या ७ पैकी ६ सामने जिंकत जोरदार पुनरागमन केले आहे.

IPL 2025 Points Table : इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामात आतापर्यंत एकूण 57 सामने खेळवले गेले आहेत. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर वाढलेल्या तणावामुळे लीगला मध्येच एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र आता परिस्थिती सामान्य झाल्यामुळे १७ मेपासून या या हंगामातील उर्वरित सामने सुरू होणार आहेत.

या उर्वरित हंगामात लीग स्टेजचे अजूनही १३ सामने खेळायचे बाकी आहेत. मात्र प्लेऑफ सामने कोणत्या ठिकाणी खेळवले जाणार याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या ५७ सामन्यांमध्ये फक्त तीनच संघ असे आहेत, जे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. तर उर्वरित ७ संघांकडे अजूनही टॉप-४ मध्ये पोहोचण्याची संधी आहे.

सध्या टॉप ४ मध्ये हे संघ

आयपीएल २०२५ च्या लीग स्टेजमधील ५७ सामन्यांनंतर गुणतालिकेवर नजर टाकल्यास, सध्या टॉप-४ मध्ये गुजरात टायटन्स संघ १६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातला लीग स्टेजमध्ये अजून तीन सामने खेळायचे आहेत आणि जर त्यांनी त्यापैकी एक सामना जिंकला तरी त्यांचे प्लेऑफमधले स्थान निश्चित होईल.

दुसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघ आहे, ज्यांनी या हंगामात अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा संघ आहे, ज्यांनी ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. त्यांच्याकडेही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची मजबूत संधी आहे. चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. हंगामाची सुरुवात त्यांच्या दृष्टीने फारशी चांगली नव्हती, पण त्यानंतर त्यांनी शेवटच्या ७ पैकी ६ सामने जिंकत जोरदार पुनरागमन केले आहे.

हे संघही प्लेऑफच्या शर्यतीत

प्लेऑफच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघही अजूनही स्पर्धेत टिकून आहेत. या संघांमध्ये सर्वात जास्त संधी दिल्ली कॅपिटल्सकडे आहे, ज्यांच्याकडे ११ सामन्यांतून एकूण १३ गुण आहेत. त्यानंतर ११ गुणांसह सहाव्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे, तर लखनऊ सुपर जायंट्स १० गुणांसह सातव्या स्थानावर आहेत. या तिन्ही संघांकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे, परंतु त्यांना स्वतःच्या विजयासोबतच इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News