मुंबई – देशांतर्गत क्रिकेटमधील माजी प्लेअर मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मन्हास बीसीसीआयचे 37 वे अध्यक्ष असतील. मन्हास यांच्या अध्यक्षपदाची घोषणा मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर करण्यात आली. मन्हास यांची यापदी बिनविरोध निवड झाली आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्स पोस्ट करत मिथुन मन्हास यांचं अभिनंदन केलं आणि आता मन्हास हे बीसीसीआयचे अधिकृत अध्यक्ष झाल्याचं लिहिलंय.

जम्मू आणि काश्मीरच्या अंडर 15 टीममध्ये खेळले
मन्हास यांनी जम्मू काश्मीर क्रिकेट टीमकडून अंडर 15, अंडर 16 आणि अंडर 19 क्रिकेट मॅचेस खेळलेल्या आहेत. तीन वर्ष मन्हास हे जम्मू आणि काश्मीरच्या अंडर 19च्या टीममध्ये होते. 1995 साली त्यांनी सुमारे 750 रन्स केले होते आणि देशातील सर्वाधिक अंडर 19 स्कोअर करणारे क्रिकेटर म्हणून मन्हास नावाजले गेले. त्यानंतर जम्मू काश्मीर क्रिकेट टीमची कॅप्टन्सी त्यांना देण्यात आली होती. या चांगल्या कामगिरीमुळे त्यांची निवड नॉर्थ झोनमध्ये झाली होती.
दिल्ली रणजी टीमचे कॅप्टन झाले आणि विजय मिळवला
12 वीच्या परीक्षेनंतर मन्हास काही महिन्यांसाठी पहिल्यांदा दिल्लीत आले होते. त्यावेळी त्यांचं वय 17 वर्षांचं होतं. त्यानंतर दिल्ली प्रिमियर टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला आणि त्यातून खेळू लागले. त्यावेळी दिल्लीच्या टीममध्ये वीरेंद्र सेहवाग आणि आशिष नेहरासारखे दिग्गज खेळत होते. 1996 साली त्यांची निवड अंडर 19 च्या नॅशनल संघात झाली. त्याच कालावधीत दिल्लीच्या रणजी ट्रॉफीसाठीही त्यांची निवड झाली. त्यावर्षी कोणतीही मॅच खेळले नसले तरी 1997 साली त्यांनी दिल्लीच्या टीममधून पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर खेळी केली.
#WATCH | Udhampur, J&K | On the new BCCI President, Union Minister Jitendra Singh says, “It is a matter of pride for us that son of the soil Mithun Manhas has become the new President of the BCCI and that too unanimously. This is an example of the way sports have been encouraged… pic.twitter.com/MEajeosS0V
— ANI (@ANI) September 28, 2025
दिल्ली टीममध्ये चांगली कामगिरी करताना मीडल ऑर्डरमध्ये त्यांनी स्वताचं स्थान निर्माण केलं. 2001-02 साली पहिल्यांदा रणजी ट्रॉफीत त्यांनी 1 हजारापेक्षा जास्त रन्स करणाऱ्या क्रिकेटरच्या यादीत नाव मिळवलं. 2006 ते 2008 सालापर्यंत ते दिल्ली रणजी टीमचे कॅप्टन राहिले. त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये 2007-08चा रणजी कप दिल्लीनं जिंकला.
दिल्ली डेयर डेव्हिल्समधून आयपीएलमध्ये प्रवेश
रणजीतील चांगल्या कामगिरीमुळे त्यांची निवडआयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये करण्यात आली. 2008 साली दिल्लीच्या टीमकडून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर 2011 साली पुणे वॉरियर्सकडूनही ते खेळले. 2015 साली चैन्नई सुपर किंग्ससोबतही ते खेळले.
2017 साली निवृत्तीनंतर कोच
2017 साली रिटायरमेंट जाहीर केल्यानंतर त्यांनी कोचिंगमध्ये एन्ट्री केली. आयपीएलमध्ये पंजाब आणि बंगळुरुच्या टीमसोबत जोडले गेले. त्यानंतर आयपीएलच्या गुजरात टीमसोबतही कोचिंग स्टाफमध्ये राहिले. 2023 साली जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये क्रिकेट ऑपरेशन्स डायरेक्टर झाले. जम्मू काश्मिरात क्रिकेटचा पाया रचण्यात त्यांचं मोठं योगदान मानण्यात येतं. यासोबतच देशांतर्गत क्रिकेटर घडवण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिलाय.











