Wankhede Cricket Stadium – मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) लवकरच शरद पवार क्रिकेट संग्रहालयचे उद्घाटन करणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या संग्रहालयचे उद्घाटन होणार आहे. वानखेडे स्टेडियमसारख्या ऐतिहासिक स्थळी हे संग्रहालय उभारण्यात आले असून, हे मुंबईच्या समृद्ध क्रिकेट परंपरेला आणि या वाटचालीला आकार देणाऱ्या आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन योगदान देणाऱ्या दिग्गजांना हे संग्रहालय समर्पित करण्यात येणार आहे.
शरद पवार-सुनील गावसकरांचा पुतळा बसविण्यात येणार…
दरम्यान, संग्रहालयाच्या प्रवेशद्वारी शरद पवार आणि सुनील गावसकर यांचे जीवनातील आकाराएवढे पुतळे पर्यटकांचे स्वागत करणार आहेत. सुनील गावसकर सरांचे योगदान हे मुंबई आणि भारतीय क्रिकेटसाठी अतुलनीय असून, त्यांचा पुतळा नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारा प्रतीक म्हणून उभा राहील. असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. संग्रहालयातील मुख्य आकर्षण म्हणजे मुंबईतील महान क्रिकेटपटूंनी दिलेल्या दुर्मीळ आणि ऐतिहासिक क्रिकेट स्मृतिचिन्हांचा अनमोल संग्रह. या वस्तू मुंबई क्रिकेटच्या समृद्ध वारशाचे आणि जागतिक क्रिकेटमधील तिच्या योगदानाचे सजीव प्रतिक आहेत.
मुंबई क्रिकेटच्या गौरवशाली इतिहास जिंवत…
एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालय हे मुंबई क्रिकेटच्या थोर दिग्गजांना आमचे कृतज्ञतेचे व श्रद्धेचे मानचिन्ह आहे आणि शरद पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची साक्ष आहे. हे संग्रहालय मुंबई क्रिकेटच्या अप्रतिम परंपरेचे जतन करणारी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देणारी जिवंत वास्तु ठरेल. याशिवाय, संग्रहालयामध्ये आधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल अनुभव केंद्र देखील आहे, जे मुंबई क्रिकेटच्या गौरवशाली प्रवासातील कथा, टप्पे आणि संस्मरणीय क्षणांना जिवंत करतं.
भारताचे आणि मुंबईचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा पुतळा ही उत्कृष्टतेची आणि चिकाटीची प्रेरणादायक खूण राहील. त्यांच्या भव्य योगदानामुळे नव्या पिढीतील खेळाडूंना मोठे स्वप्न पाहण्याची आणि त्यासाठी झपाटून मेहनत करण्याची उमेद मिळेल, असा विश्वास एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला आहे.





