पाकिस्तानचा क्रिकेट संघ म्हणलं की त्यांची हिरव्या कलरची जर्सी ही आपण गृहीत धरतो. परंतु आज पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच गुलाबी जर्सी घातली. आज रावळपिंडी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी गुलाबी जर्सी घालून मैदानात एन्ट्री केली.
गुलाबी जर्सी मागचे कारण काय?
ऑक्टोबर हा महिना जगभरात पिंकटोबर म्हणून साजरा केला जातो, हा सण स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, लवकर निदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना या प्राणघातक आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी आहे. पाकिस्तानने पहिल्यांदाच स्तनाच्या कर्करोगाच्या जागरूकतेसाठी गुलाबी जर्सी थीम घातली आणि या मोहिमेला चालना दिली. पीसीबीने सोशल मीडियाद्वारे नवीन जर्सीची घोषणा केली आणि लिहिले की “गुलाबी एका महत्त्वाच्या कारणासाठी.

असंख्य जीव वाचू शकतात
पीसीबीचे सीओओ सुमैर अहमद सय्यद यांनी सामाजिक कार्यासाठी संस्थेच्या वचनबद्धतेवर भर देत म्हटले की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या समाजाला प्रभावित करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी क्रिकेटची ताकद आणि पोहोच वापरण्यात खूप अभिमान बाळगतो. पिंक रिबन मोहिमेद्वारे, आम्ही स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे असंख्य जीव वाचू शकतात. यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने असेच उपक्रम केले होतें.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रीझा हेंड्रिक्स (६०) च्या शानदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ९ बाद १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानची फलंदाजी अजून चालू आहे. आत्तापर्यंत पाकिस्तानने 4 षटकात बिनबाद 30 धावा केल्या आहेत.