ओव्हल – इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचमध्ये अनपेक्षित विजय मिळवत टीम इंडियानं सीरिज ड्रॉ करण्यात यश मिळवलंय. या सामन्याचा मानकरी ठरलाय तो टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज
शेवटच्या दिवशी तीन विकेट काढत मोहम्मद सिराजनं मॅच फिरवली. यामुळं सिराज आणि टीम इंडियानं पाचव्या दिवशी विजयाचा जल्लोष केला. ओव्हल टेस्टमध्ये सिराजनं 9 विकेट्स घेतल्या. मॅच विनिंग कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणूनही घोषित करण्यात आलं. या संपूर्ण सीरिजमध्ये त्याने एकून 23 विकेट्स घेतल्या आहेत.
पण या विजयाआधी सिराजच्या आयुष्यात जे काही घडलं, ते खुपच थरारक होतं.
चौथ्या दिवशी काय झालं?
भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेली ओवल टेस्ट चौथ्या दिवशी रोमांचक मोडवर आली. ही मॅच जिंकून सिरीज जिंकण्याची स्वप्नं इंग्लंड पाहत होता. तोच मॅचचा नूर पालटला आणि मॅच रोमांचक झाली.. इंग्लंडची टीम चौथ्या दिवशीच ऑल आऊट होण्याच्या मार्गावर होती. मात्र ऐन मोक्याच्या वेळी सिराजच्या हातून कॅच सुटला. हा कॅच नाही, तर जणू भारताच्या हातून मॅचच सुटली. इंग्लंडच्या तंबूत जोश हाय होता, तर सिराजला मोठा मानसिक धक्का बसला होता.
पाचव्या दिवशी कसर भरुन काढली
शेवटच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी केवळ 35 धावांची गरज होती. तर भारताला हव्या होत्या 4 विकेट्स… विजयाची दिल्ली अजून दूर होती. पण आदल्या दिवशी कॅच सोडणारा सिराज जिद्दीला पेटला होता.
टीम इंडियाही विजयाच्या जिद्दीनं पुन्हा मैदानात उतरली. सिराजच्या बॉलिंगमध्ये इंग्लंडला आगीचा गोळा दिसू लागला. त्याच्या प्रत्येक चेंडूवर इंग्लंडचे खेळाडू चारी मुंड्या चित होत होते. दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध कृष्णाला टार्गेट करत इंग्लंडची टीम विजयाच्या लक्ष्याच्या दिशेनं पुढं सरकत होती. पण सिराज त्यांच्या विजयाच्या वाटेत खुट्टा ठोकून बसला होता. आणि शेवटी झालंही तेच सिराजने दणादण विकेट्स घेत इंग्लंडची उरली सुरली टीम तंबूत धाडली. आणि आदल्या दिवशीच्या नामुष्कीचा त्यानं व्याजासहित वचपा काढला. टीम इंडियानं अवघ्या 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. आणि इंग्लंड टीमवर त्यांचाच घरात हात चोळत बसायची वेळ आली.





