वेस्ट इंडिज विरोधात पहिल्या कसोटीत अडीच दिवसांत खेळ खल्लास; टीम इंडियाचा 140 धावांनी दणदणीत विजय

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं 1-0 अशी आघाडी घेतली. भारताकडून रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांनी दमदार शतकं झळकावली, तर मोहम्मद सिराजनं शानदार गोलंदाजी केली.

India Vs West Indies First Test Match : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. दोन कसोटी सामने वेस्ट इंडिज संघ भारताविरोधात खेळणार आहे. दरम्यान, अहमदाबाद येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव १४० धावांनी वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं 1-0 अशी आघाडी घेतली. भारताकडून रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांनी दमदार शतकं झळकावली, तर मोहम्मद सिराजनं शानदार गोलंदाजी केली. हे चार खेळाडू भारतीय संघाच्या विजयात सर्वात मोठे हिरो ठरले.

वेस्ट इंडिजकडून फलंदाजीत निराशा

भारतीय क्रिकेट संघानं पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 140 धावांनी पराभव केला. या सामन्यात वेस्ट इंडिजचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. वेस्ट इंडिजकडून पहिला डाव 162 धावांवर सर्वबाद झाला तर दुसऱ्या डावात केवळ 146 धावा करता आल्या. दोन्ही डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीमुळं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना धावा काढण्यात अडचण येत होती. सिराजनं सर्वाधिक चार बळी घेतले. दरम्यान, जसप्रीत बुमराहनं त्याच्या उत्कृष्ट यॉर्करसह तीन बळी घेतले. तर कुलदीप यादवनं दोन बळी घेतले. तर विंडीजकडून जस्टिन ग्रीव्हजनं सर्वाधिक 32 धावा केल्या, ज्यामुळं संघाला 100 धावांचा टप्पा गाठता आला. इतर कोणताही खेळाडू सातत्यपूर्ण फलंदाजी करु शकले नाहीत.

तीन खेळाडूंकडून दमदार शतकं

पहिल्या कसोटीत  भारताने फलंदाजांची सराव करताना शानदार कामगिरी केली आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. भारतीय संघाकडून चक्क तीन फलंदाजाकडून शतक ठोकण्यात आली. यामध्ये सलामीवीर केएल राहुल (100 धावा), ध्रुव जुरेल (125 धावा) आणि रवींद्र जडेजा (104 धावा) यांनी शतकं झळकावली. शुभमन गिलनंही 50 धावा केल्या. यशस्वी जैस्वालही चांगल्या लयीत दिसत होता, पण तो 36 धावा करत आपला डाव वाढवू शकला नाही. भारताने पहिल्या डावात 5 गडी गमावून 448 धावांवर डाव घोषित केला.

तर दुसऱ्या डावातही विंडीजला चमकदार कामगिरी करता आली नाही. संपूर्ण संघ केवळ 146 धावा करु शकला. भारताकडून रवींद्र जडेजानं दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनं तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने दोन आणि वॉशिंग्टन सुंदरनं एक विकेट घेतली. तर प्लेअर ऑफ दी मॅच म्हणून रवींद्र जडेजा यांची निवड करण्यात आली.


About Author

Astha Sutar

Other Latest News