बंगळुरु – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरु जवळ नव्या क्रिकेट स्टेडियमी घोषणा केली आहे. या स्टेडियममध्ये एकाचवेळी 80 हजार प्रेक्षक मॅच पाहू शकणार आहेत. प्रेक्षकांच्या संख्येचा विचार केल्यास अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर देशातील हे दुसरं मोठं स्टेडियम ठरण्याची शक्यता आहे.
कर्नाटक सरकारच्या बैठकीत सूर्या सिटी, बोम्मासंद्रा मध्ये स्टेडियमच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. यासाठी 1650 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
आरसीबीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीनंतर निर्णय
हे नवं स्टेडियम चिन्नास्वामी स्टेडियमपासून 22 किलोमोीटर अंतरावर असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर सत्कारावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत काही जणांचे प्राण गेले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. आरसीबीनं पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. या विजेत्यांचा सत्कार करण्यासाठी 4 जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांना प्राण गमवावे लागले होते.
नवं स्टेडियम 100 एकरमध्ये उभारणार
कसं असेल नवं स्टेडियम?
1650 कोटी रुपयांच्या या स्टेडियमचा खर्च कर्नाटक हाऊसिंग बोर्ड उचलणार आहे. यात केवळ क्रिकेट मैदानच नाही तर 8 इनडोअर आणि 8 आऊटडोअर खेळांसाठी सुविधा, आधुनिक जिम, ट्रेनिंग सेंटर, स्विमिंग पूल, गेस्ट हाऊस, हॉस्टेल, हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय आयोजनांसाठी मोठा हॉलही बांधण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या नव्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीप्रमाणे हे स्टेडियम उभं राहण्याची शक्यता आहे.
मोठ्या आयोजनांसाठी चिन्नास्वामी अपुरं
बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणानंतर चौकशी करणाऱ्या न्या. डॉन मायकल कुन्हा आयोगानं चिन्नास्वामी स्टेडियम मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी अयोग्य असल्याचा निष्कर्ष काढला होता. चिन्नास्वामी स्टेडियम हे 17 एकर परिसरात पसरलेलं असून याची प्रेक्षकांची मर्यादा 32 हजारांच्या घरात आहे. अशा स्टेडियममध्ये मॅचेस करण्यापेक्षा जास्त मोठी जागा असलेल्या आणि पार्किंगची जादा क्षमता असलेल्या मैदानांवर स्पर्धा व्हायला हव्यात, असंही आयोगानं सुचवलं होतं.






