MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

विजयी भव..! दिव्याच्या जिद्दीला व बुद्धिमत्तेला सलाम, विश्वचषक बुध्दीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
दिव्या देशमुख हिने केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. ती बुद्धिबळातील भारताची नवीन आशास्थान आहे. तिच्या जिद्दीला आणि बुद्धिमत्तेला सलाम, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
विजयी भव..! दिव्याच्या जिद्दीला व बुद्धिमत्तेला सलाम, विश्वचषक बुध्दीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Divya Ddeshmukh – महाराष्ट्राची व नागपुरची कन्या दिव्या देशमुखने २०२५ च्या FIDE महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जीएम हरिका द्रोणवल्लीचा पराभव करून उल्लेखनीय कामगिरी केली. दोन्ही टाय-ब्रेक गेम जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यावेळी दिव्या देशमुख चांगलीच भावूक झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले होते. आता सेमी-फायनलसह अंतिम सामना जिंकण्याचे तिचे लक्ष्य असणार आहे. दरम्यान, आता देशभरातून दिव्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अंतिम फेरीत दाखल होणारी दिव्या पहिली भारतीय

महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी नागपूरची दिव्या देशमुख पहिली भारतीय ठरली आहे. दिव्याने माजी विश्वविजेती चीनची मातब्बर खेळाडू टॅन झोनग्यी हिला पराभूत केले. यासह ती महिला ‘कॅंडिडेट्स’ स्पर्धेत पात्र ठरली आहे. या ऐतिहासिक दुहेरी कामगिरीसाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे. दरम्यान, महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चमकदार विजयासह अंतिम फेरीत धडक देणाऱ्या मास्टर दिव्या देशमुखला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दिव्याच्या जिद्दीला व बुद्धिमत्तेला सलाम…

“दिव्या देशमुख हिने केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. ती बुद्धिबळातील भारताची नवीन आशास्थान आहे. तिच्या जिद्दीला आणि बुद्धिमत्तेला सलाम. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! दिव्याचे यश हे देशातील प्रत्येक युवक-युवतीसाठी प्रेरणादायी आहे.” विशेष म्हणजे, दिव्या देशमुखने गतवर्षी कनिष्ठ गटात महिला विश्वचषकावर नाव कोरले होते. ही घोडदौड कायम ठेवत तिने यंदा वरिष्ठ स्तर स्पर्धेत अव्वल कामगिरी करत आपली छाप उमटवली आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.