India Vs Pakistan Asia Cup 2025 – आशिया कप २०२५ स्पर्धेतील आज अंतिम सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळं हा सामना कोण जिंकणार, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. आशिया कपचा १७ वा हंगाम ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळला जात आहे. २०२५ च्या आशिया कपचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवण्यात आला. स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी आज दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. पण या सामन्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे.
भारत ट्रॉफी स्विकारणार नाही?
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यापूर्वीच मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी, जे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख देखील आहेत. ते अंतिम सामन्याला उपस्थित राहण्यासाठी दुबईला पोहोचले. नक्वी यांची दुबईतील उपस्थिती पाहता, ते सामन्यानंतरच्या सादरीकरणात उपस्थित राहतील आणि विजेत्या संघाला ट्रॉफी सादर करतील हे निश्चित आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील त्यांची उपस्थिती भारतीय संघाचं लक्ष वेधून घेईल.

बीसीसीआय काय निर्णय घेणार?
नक्वी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर भारतविरोधी विधानं केली आहेत. भारतीय संघानं पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. तसंच असं दिसतं की भारतीय खेळाडू पीसीबी प्रमुखांशी संवाद साधणार नाहीत, ज्यांनी उघडपणे भारतविरोधी विधानं केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नक्वी हे आज संध्याकाळी येतील आणि एसीसी अध्यक्ष म्हणून ते विजेत्या संघाला ट्रॉफी सादर करतील. कर्णधार सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील संघ सादरीकरण समारंभाला उपस्थित राहू शकत नाही. कारण ते नक्वीसोबत स्टेज शेअर करण्यास तयार नाहीत असं वृत्त आहे. पण यावर बीसीसीआय काय निर्णय घेते हे महत्वाचे ठरणार आहे.
४१ वर्षानंतर आमनेसामने
इतिहासात पहिल्यांदाच आठ संघांनी आशिया कपमध्ये भाग घेतला. यावेळी भारत, पाकिस्तान, ओमान, युएई, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँग या संघांनी स्पर्धेत भाग घेतला. भारताने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे, आठ वेळा. शेवटचा आशिया कप २०२३ मध्ये एकदिवसीय स्वरूपात झाला होता, जिथे भारतीय संघाने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला होता.











