भूक लागू नये म्हणून झोपेच्या गोळ्या घेत होती, मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री

Savita Malpekar struggle:   मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी आपल्या हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. सविता मालपेकर आपल्या अभिनयासोबतच आपल्या रोखठोक बोलण्यानेसुद्धा चर्चेत असतात. त्या नेहमीच बिनधास्तपणे सिनेविश्वातील अनेक गोष्टी मांडत असतात. अनेकदा त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील विविध गोष्टींबाबत खुलेपणाने संवाद साधला आहे.

सविता मालपेकर स्ट्रगल-

दरम्यान आता सविता मालपेकर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आयुष्यात किती कष्ट करून आज ही प्रसिद्धी आणि पैसे कमावले आहेत याबाबत आता चर्चा होत आहे. नुकतंच ‘बोलक्या रेषा’ या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये सविता मालपेकर पैसे नसताना पोटाची भूक भागवण्यासाठी काय करायच्या याबाबत चकित करणारी माहिती दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊया.

”बोलक्या रेषा” पोस्ट-

”बोलक्या रेषा” या पेजवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, ”भूक लागू नये म्हणून मी झोपेच्या दोन गोळ्या….सविता मालपेकर यांनी सांगितला कठीण काळातला किस्सा..आपल्या रोखठोक बोलण्यामुळे तसेच सहजसुंदर अभिनयामुळे ओळखल्या जाणाऱ्या सविता मालपेकर यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मुलगी झाली हो, गाढवाचं लग्न, मुळशी पॅटर्न अशा माध्यमातून सविता मालपेकर प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिल्या आहेत.

सविता मालपेकर या लग्नानंतरही माहेरचेच आडनाव लावतात. चार भावंड आई वडील असे त्यांचे सुखी कुटुंब होते. पण सविता मालपेकर लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे चार भावंडांची पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. खूप कमी वयातच सविता यांनी दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी, शेतात मोलमजुरी करण्यास सुरुवात केली होती. सविता मालपेकर यांच्या आईचे वडील मुंबईतील काळा चौकी येथे सोन्या चांदीचे व्यापारी होते. त्यामुळे घरात अगदी सोन्याचा धूर निघावा अशी त्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम होती. त्याकाळात सविता मालपेकर यांच्या आईवडिलांनी प्रेमविवाह केला होता.

लग्नानंतर काही वर्षाने हे मालपेकर कुटुंब राजपुरला स्थायिक झाले. त्याकाळात अनेक कलाकार मंडळी चहापाण्याला मालपेकर कुटुंबाकडे येत असत. अशातच त्यांच्या वडिलांची आणि राजा गोसावी यांची मैत्री झाली होती. सविता मालपेकर यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी राजा गोसावी यांना कळली तेव्हा त्यांनी सविताला नाटकात काम करण्याची संधी देऊ केली. ‘डार्लिंग डार्लिंग’ हे सविता मालपेकर यांचं पहिलं व्यावसायिक नाटक. याअगोदर रत्नागिरी येथे त्या नाटकातून काम करायच्या तेव्हा त्यांना ३५ रुपये मिळायचे.

राजा गोसावी यांच्या नाटकानिमित्त त्या मुंबईत गेल्या. राजा गोसावी, नयना आपटे, अशोक सराफ अशा मोठ्या कलाकारांसोबत त्यांना स्टेजवर उतरण्याची संधी मिळाली. नाटकातून काम केल्यानंतर मिळाले पैसे त्या घरखर्चासाठी गावी पाठवत असत. त्यामुळे रोजचे जीवन जगण्यासाठी त्यांची धडपड सुरू असायची. अशातच मुंबइला आल्यानंतर काही दिवस त्या मामाकडे राहिल्या. पण आजोबा आणि नंतर मामाचेही निधन झाले तेव्हा त्यांना मुंबईत राहण्यासाठी खूप मोठा स्ट्रगल करावा लागला. मावशी मुंबईलाच असल्याने काही काळ त्यांचा आधार मिळाला.

गावी घरखर्चाला पैसे देता यावे म्हणून सविता मालपेकर सकाळचा नाश्ताच करत नव्हत्या. त्याकाळातील अनेक कलाकार मंडळी एकमेकांना समजून घेत असत. नाश्ता ,जेवणाला सगळ्यांना सोबत घेत असत. भक्ती बर्वे, सदाशिव अमरापूरकर यांना त्याची जाणीव झाली तेव्हा ते सविताला उठवून नाश्ता करायला नेत असत. पण ही मंडळी आज उद्या आपल्याला खाऊ घालतील आपल्याला किमान एक दिवस तरी त्यांना खाऊ घालावे लागेल या विचाराने त्यांनी एक युक्ती काढली.त्यावेळी कोणी आपल्याला बोलावू नये म्हणून आणि भूक लागू नये म्हणून त्या झोपेच्या गोळ्या खायच्या. कंपोज नावाच्या झोपेच्या गोळ्या त्यावेळी २ रुपयाला १० गोळ्यांचं पाकिट मिळायचं. ते खाऊन त्या सकाळचा नाश्ता स्कीप करायच्या.”

अशाप्रकारे बोलक्या रेषाच्या पेजवर सविता मालपेकर यांच्या आयुष्यातील अनेक सत्ये सांगण्यात आली आहेत.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News