Mahavatar Narsimba : ब्लॉकबस्टर ‘महावतार नरसिम्हा’ने या वर्षीचा सर्वात मोठा आणि अभिमानास्पद टप्पा पार केला आहे. भारतीय एनिमेशन उद्योगासाठी ऐतिहासिक मानला जाणारा हा क्षण म्हणजे 98व्या अकादमी अवॉर्ड्स, म्हणजेच ऑस्कर 2026 साठी जाहीर झालेल्या बेस्ट एनिमेटेड फीचर फिल्मच्या प्राथमिक शॉर्टलिस्टमध्ये या भारतीय चित्रपटाची एंट्री होणे. जगभरातील टॉप 35 एनिमेटेड चित्रपटांच्या या प्रतिष्ठित यादीत भारतीय चित्रपटाचा समावेश होणे ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.
अश्विन कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘महावतार नरसिम्हा’ने भगवान नरसिंहांच्या महावताराची कथा अत्याधुनिक आणि भव्य एनिमेशनच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर साकारली. भारतीय पुराणातील समृद्ध कथा, त्यामधील ताकद, भावनांची खोली आणि त्याला जागतिक पातळीवर पोहोचवण्याची दिग्दर्शकांची दृष्टी या सगळ्यांनी एकत्र येत हा चित्रपट विशेष ठरला.

कधी झाला होता प्रदर्शित – Mahavatar Narsimba
जुलै 2025 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व कमाई केली. केवळ काही आठवड्यांतच या चित्रपटाने जगभरातून 325 कोटी रुपयांपेक्षा जास्तची कमाई करत भारतातील सर्वाधिक कमाई करणारा एनिमेटेड चित्रपट म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला. एनिमेशन या श्रेणीत भारतीय चित्रपटाला इतका मोठा प्रतिसाद मिळणे हे स्वतःमध्येच उल्लेखनीय ठरले.
ऑस्कर 2026 च्या शॉर्टलिस्टमध्ये ‘महावतार नरसिम्हा’चे नाव येताच हा चित्रपट थेट जागतिक स्पर्धेत उतरला आहे. या यादीत डिझ्नीचा झूटोपिया 2, के-पॉप डेमन हंटर्स, डेमन स्लेयर: इन्फिनिटी कॅसल अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जाणाऱ्या चित्रपटांचाही समावेश आहे. एकूण 34 चित्रपट या श्रेणीत स्पर्धेत असून त्यापैकी केवळ 5 चित्रपटांना अंतिम नॉमिनेशन मिळणार आहे. त्यामुळे पुढील टप्पा अधिक कठीण आणि आव्हानात्मक असला, तरी ‘महावतार नरसिम्हा’ची मजबूत दावेदारी सर्वांच्याच नजरा खेचून घेत आहे.
काय होते निकष –
ऑस्करच्या नियमांनुसार बेस्ट एनिमेटेड फीचर फिल्मसाठी पात्र ठरण्यासाठी चित्रपटाची लांबी 40 मिनिटांपेक्षा जास्त असणे आणि चित्रपटातील किमान 75 टक्के भाग एनिमेशनचा असणे आवश्यक आहे. या सर्व निकषांवर ‘महावतार नरसिम्हा’ पूर्णपणे उतरला आहे. चित्रपटातील शानदार व्हिज्युअल्स, प्रभावी कथा रचना, परिष्कृत ग्राफिक्स आणि भारतीय पुराणकथेला जागतिक प्रेक्षकांसमोर नवे रूप देण्याच्या पद्धतीने या चित्रपटाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाने या यशात अधिकच भर पडली.
जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या अंतिम ऑस्कर नॉमिनेशनकडे देशभरातील चित्रपटप्रेमी, एनिमेशन उद्योग आणि ‘महावतार नरसिम्हा’ची टीम उत्सुकतेने पाहत आहे. जर या चित्रपटाला अंतिम नॉमिनेशन मिळाले, तर हा पराक्रम साधणारा भारताचा पहिला एनिमेटेड चित्रपट ठरेल. दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना सांगितले की, ही केवळ त्यांच्या टीमची नाही, तर संपूर्ण भारतीय एनिमेशन उद्योगाची जिंक आहे. भारतीय कथा जगातील सर्वात मोठ्या आणि मानाच्या मंचावर पोहोचाव्यात हा त्यांचा दीर्घकाळापासून असलेला प्रयत्न असून, या यशामुळे तो स्वप्निल प्रवास आणखी एक पाऊल पुढे सरकला आहे. ‘महावतार नरसिम्हा’ने भारतीय एनिमेशनच्या क्षमतांना जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आणत नवा मार्गच निर्माण केला आहे. आता सर्वांची नजर या चित्रपटाच्या पुढील ऑस्कर प्रवासावर खिळून आहे.











